---Advertisement---
दोन सज्ञान किंवा अविवाहित व्यक्तींनी परस्पर संमतीने ठेवलेले शारीरिक संबंध हे कोणाचेही चारित्र्य खराब असल्याचे प्रमाण ठरू शकत नाही, अशी महत्त्वाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तसेच प्रत्येक प्रेमसंबंधाचा शेवट लग्नातच होतो असे नाही, त्यामुळे नाते लग्नापर्यंत पोहोचले नाही म्हणून फसवणूक करण्यात आली असे मानता येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
हे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने तेलंगणा पोलीस भरतीशी संबंधित एका प्रकरणात नोंदवले.
काय होते प्रकरण?
एका उमेदवारावर २०१४ मध्ये लग्नाचे अमिश दाखवून बलात्कार केल्याचा आरोप त्याच्या प्रियसीद्वारे करण्यात आला होता. मात्र हे प्रकरण परस्पर संमतीने मिटले आणि २०१५ मध्ये लोकअदालतीत त्याचा निर्णय झाला. या प्रकरणात उमेदवाराविरुद्ध आरोप सिद्ध झाले नव्हते. या जुन्या प्रकरणाचा आधार घेत उमेदवाराचे चारित्र्य योग्य नसल्याचे सांगत तेलंगणा राज्यस्तरीय पोलीस भरती बोर्डाने त्याची कॉन्स्टेबल पदावरील नियुक्ती नाकारली होती. याविरोधात उमेदवाराने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
दोन सज्ञान किंवा अविवाहित व्यक्तींना परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्यास कायद्याचे बंधन नाही. एखादे नाते लग्नात बदलले नाही म्हणून त्यातून फसवणूक झाली असे म्हणता येत नाही. अशा कारणांवरून एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य खराब असल्याचा निष्कर्ष काढणे योग्य नाही.
नियुक्ती देण्याचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने उमेदवाराची याचिका मंजूर करत तेलंगणा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. तसेच पोलीस भरती बोर्डाने उमेदवाराच्या नियुक्तीबाबत पुनर्विचार करावा, असे निर्देश दिले. केवळ जुन्या आणि निकाली निघालेल्या प्रकरणाचा आधार घेऊन नोकरी नाकारणे योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.









