---Advertisement---
जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम आज थेट सराफा बाजारावर दिसून आला असून सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचे दर तब्बल ४ हजार रुपयांनी कमी झाले आहेत, तर चांदीच्या दरात तब्बल ११ हजार रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला असून गुंतवणूकदारांचेही लक्ष पुन्हा बाजाराकडे वळले आहे.
आज जळगावमध्ये सोन्याचा दर १ लाख ४७ हजार रुपयांवर आला आहे, तर चांदीचा दर २ लाख ३८ हजार रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यपूर्वेतील तणाव, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी अस्थिरता पाहायला मिळत होती. मात्र आजच्या घसरणीने बाजारात वेगळे चित्र निर्माण केले आहे.
जळगाव सुवर्णगरीतील सराफा व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीवरील गुंतवणूक काही प्रमाणात कमी झाली असून नफावसुलीमुळे दरात घसरण झाली आहे. तसेच डॉलर मजबूत झाल्यास सोन्याच्या किमतीवर दबाव येतो, याचाही परिणाम बाजारावर झाला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
सोन्या-चांदीच्या दरातील या घसरणीमुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. अनेक ग्राहकांनी दर कमी झाल्यानंतर खरेदीसाठी सराफा बाजाराकडे वळण्यास सुरुवात केली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये झालेली ही घसरण बाजारासाठी महत्त्वाची मानली जात आहे. पुढील काही दिवसांत जागतिक बाजारातील परिस्थितीनुसार दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.









