Jalgaon News : उमर्टीप्रकरणी दोन राज्यातील पोलिसांच्या समन्वयातून उपाययोजना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव : महाराष्ट्राच्या लगत मध्यप्रदेश सिमेवर अवैध शस्त्र निर्मिती, विक्रीचे अवैध प्रकार चालतात. मध्यप्रदेश पोलिसांशी समन्वय साधुन हा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने पाउले उचलले जातील. व उपाययोजना केली जाईल. यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश पोलिसांचे कॉर्डिशन राहील, अशी माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवार, १६ रोजी जळगाव विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक भाजपाचे पदाधिकारी, आमदार उपस्थित होते. महाराष्ट्राला लागून मध्यप्रदेश सीमेवर इनलिगल ॲक्टीव्हीटी चालतात. अवैध शस्त्रे बनवून हे शस्त्र महाराष्ट्रात विक्रीला येतात. महाराष्ट्राच्या सीमेत शस्त्रे सप्लाय केले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शनिवारी रात्री पोलिसांनी ट्रॅप लावला होता. त्यावेळी उमर्टीच्या जमावाने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. एका कर्मचाऱ्याला उचलून नेले. मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याची सुटका केली. तसेच अवैध शस्त्रे आपल्या हद्दीत सप्लायसाठी आणले म्हणून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

मध्यप्रदेशाच्या सीमेवर हे अवैध शस्त्रे तयार केले जातात. हा परिसर महाराष्ट्राच्या सीमेलगत आहे. त्यामुळे त्याचे परिणाम महाराष्ट्रावर होतो. शस्त्र विक्रीला येतात. हे अवैध प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस मध्यप्रदेश पोलिसांशी समन्वय साधून उपाययोजना करतील, असे ते म्हणाले.

पप्पीसिंग मोठे नेटवर्क

सुत्रांच्या माहितीनुसार, चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतलेला पप्पीसिंग हा अवैध शस्त्र सप्लाय करण्यासाठी माहिर आहे. त्याचे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात नेटवर्क आहे. या अवैध कामासाठी त्याने त्याच्या हाताखाली १०० तरुण काम करताहेत. गावठी कट्टे किंवा अन्य शस्त्र संदर्भात पप्पीसिंग याचा रोल महत्वपूर्ण आहे. शस्त्राची किमत, डिलेव्हरी कोणाला, कोठे करायची ? याबद्दल पप्पीसिंग हाच ठरवत असतो. त्यानंतर त्याच्याकडील तरुण हे शस्त्र सप्लाय करण्याच्या अवैध कृतीला स्वरुप देतात.

म्हणून चोपड्याला प्राधान्य उमर्टीच्या सिमेलगत

शस्त्र सप्लाय करण्यासाठी संशयितांना महाराष्ट्रातील चोपडा हे अतीशय सोयिस्कर ठरते. जलद गतीने सप्लाय पास करण्याचा मार्ग म्हणून संशयित सत्रसेन, लासुन, बुधगाव फाटा मार्गे पंटरला रवाना करतात. येथून महाराष्ट्रात आणि गुजरातकडेही अवैध शस्त्रे सप्लाय करता येतात. यामुळे चोपडा ग्रामीणमध्ये अवैध शस्त्रांचा उपद्रव असतो, असे सुत्रांकडून सांगण्यात आले. अवैध शस्त्रसंदर्भात चोपडा ग्रामीण पोलीस वारंवार कारवाई करत संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेत असल्याचे चित्र अनेक वेळा समोर आलेले आहे.

पाच संशयितांवर गुन्हा दाखल

उमर्टी (ता. चोपडा) ते पार उमर्टी (ता. वरला, मप्र) येथे पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्नप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात रविवार, १६ रोजी पप्पीसिंग उर्फ नरेंद्रसिंग प्रितमसिंग बर्नाला, राजेंद्रसिंग प्रितमसिंग बर्नाला, सुरेंद्रसिंग प्रितमसिंग बर्नाला, गुरुदेवसिंग लिवरसिंग बडोल, बादलसिंग उर्फ धरमसिंग दिलदारसिंग बर्नाला (सर्व रा. पार उमर्टी म.प्र.) यांच्यावर खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि आर्म गर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांनी पप्पीसिंग याला ताब्यात घेत अटक केली आहे. पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

पथकातील तीन जण जखमी

सहायक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पोलीस कॉन्सटेबल किरण पारधी आणि शशिकांत पारधी हे संशयितांच्या हल्ल्यात जखमी झाले. दोघांच्या पायाला जबर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान हल्ला करुन अपहरण केल्याच्या प्रकरणात संशयित आरोपींची संख्या वाढेल. या संशयितांना ताब्यात घेण्यासाठी मध्यप्रदेश पोलिसांची मदत घेण्यात येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.