जळगाव : केळी भरून रोडने जाणाऱ्या ट्रकला थांबवून पोलिसाने ५०० रुपये लाच मागितली. पैसे नाहीत म्हणून चालकाने ५० रुपये हातात टेकले. इतकीच काय आमची इज्जत. पूर्ण १०० तरी द्या, असे पोलीस चालकाला म्हणाला. त्यानंतर पोलिसाने हे ५० रुपये खिशात ठेवले. हे लाचखोरीचे नाट्य पाचोरा येथे दोन पोलिसांच्या समोर घडले, हे विशेष. हा लज्जास्पद व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वर्दीचे धिंडवडे निघाले.
देशातील प्रशासकीय यंत्रणा लाचखोरीने कलंकित झाली आहे. कितीका पगार असेना, मात्र लाच मागण्याची, स्वीकारण्याची स्वार्थी, लालची प्रवृत्ती सुटत नाही, असे चित्र, एसीबीच्या कारवाईतून विविध लाचखोरीच्या प्रकरणातून समोर येताहेत. लाच एक रुपयाची असो की, एक हजाराची तो गुन्हाच असतो. लाचखोरीचा शिक्का लागतो तेव्हा त्या अधिकारी, कर्मचाऱ्याची प्रतिष्ठा, इज्जत धुळीस मिळते, हे सांगणे ना लगे. शासनाच्या विविध कार्यालयात इथे लाच स्वीकारली जात नाही. असे फलक येणाऱ्याच्या नजरेस पडतात. कोणता विभाग किंवा कोणते कार्यालय १०० टक्के क्लीन आहे, असे शोधल्यास अभ्यासकाचे डोके चक्रावून जाईल. पण शंभरटक्के लाचमुक्त असा परिचय येणार नाही, असे उपहासात्मकतेने यंत्रणेबद्दल समाजात बोलले जाते. त्याच्याकडे कानाडोळा कसा करता येईल? प्रशासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात लाच मागणे हे अधिकार पदावरील व्यक्तींना जणू माझा हक्कच आहे. अशा आविर्भावातून कृती होताना दिसताहेत. अशा प्रकारांनी गरजू लोक, तक्रारदार यांची अधिक कुचंबणा होत आहे. कर्तव्यासाठी सेवेत हजर होण्यापूर्वी शपथ घेणाऱ्या नोकरशाहीचा खरा चेहरा समोर येतो, तेव्हा नागरिकांचा संताप होतो.
अनेकांच्या कर्तव्यात सेवेचा ठसा
प्रशासनात सर्वच एकाच माळेतील मणी, असे मात्र नाही. अनेक अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे अविरत कर्तव्य बजावताना दिसतात. त्यांच्या निष्कलंक सेवेतून जनतेला दिलासा मिळतो आहे, हे नाकारता येणार नाही. अशा प्रामाणिक लोकांची संख्या भलेही कमी असेल, मात्र त्यांच्या कामाचा व्याप मोठा असल्याने त्या त्या ठिकाणी प्रशासकीय कामांना गती मिळते. प्रश्न निकाली निघतात. हे मान्य करावे लागेल. अनेक अधिकारी देशसेवा आणि जनसेवा म्हणून प्रशासनात जबाबदारी पार पाडत असल्याचे सुखद चित्रही दिसतेय. त्यांच्यातील वेगळेपणा उठून दिसतोय. त्यांच्या परिणामकारक कार्यपध्दतीचा प्रभाव प्रशासनात असतो. पाचोरा येथील घडलेले लाचखोरीचे नाट्य वर्दीसाठी धक्कादायक आहे.
वर्दीतील पोलिसाला समाजातून दादा म्हणून सन्मान दिला जात आहे. समाजात सर्वत्र त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. कायदा सुव्यवस्थेची धुरा सांभाळणारे पोलीस दल शोभेचे असता कामा नये. त्यांच्यात वर्दीचा खाक्या दिसला पाहिजे, अशी अपेक्षा समाजातून व्यक्त केली जाते. चिरीमिरी घेऊन, लाच मागितली जात असल्यास हा खाक्या, रुबाब राहील तरी कसा? जनतेच्या मनात वर्दीबद्दलची विश्वासार्हता राहील कशी? या प्रवृत्तीचे उदात्तीकरण होणार नाही, यासाठी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सुयोग्य व परिणामकारक कार्यपध्दतीचा परिचय पोलीस दलातून जिल्हावासियांना दिला आहे. अशोभनीय प्रकार जेव्हा केव्हा चव्हाट्यावर आले, त्या त्या वेळी त्यांनी तत्काळ कारवाई केली आहे. पाचोरा लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी अॅक्शन घेतली आहेच. मात्र असे अशोभनीय प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी अधिक उपाययोजना करण्याची गरज बनली आहे.
समाज नतमस्तक
वर्दी असो की, आणखी कोणते शासकीय कार्यालय. पदावरील जबाबदारी पार पाडत असणाऱ्यांना या पदाचा, वर्दीचा लोकांकडून सन्मान मिळत असतो. हा सन्मान टिकवून ठेवणे, हे खूप अवघड असते. मात्र प्रामाणिकपणाच्या बळावर हा सन्मान टिकवून ठेवता येतो. त्यांची विश्वासार्हताही अधिक वाढत असते. अशा व्यक्तीकडे समाज आदर्श म्हणून पाहत असतो. इतकेच काय त्यांच्यापुढे समाज नतमस्तक होत असतो. अशा व्यक्तींमुळे प्रशासनाचीही प्रतिमा उंचावण्याला मदत होते.