जळगाव : महागाईच्या काळात अधिकचे पैसे मिळावेत म्हणून व्यवसायासोबतच जोडधंदा करण्याकडे कल वाढल्याचे पाहावयास मिळत आहे. यासाठी व्यासासायिक विविध शक्कल लढवीत असल्याचे आपणास आढळून येते. यातच पारोळा तालुक्यात अधिकचे पैसे मिळविण्यासाठी एका शेतकऱ्याने चक्क गांजाची शेती करत आपले उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केल्याचा उघड झाला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखा व पारोळा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका शेतातून १२ लाख रुपये किंमतीचा १२० किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यातील आंबापिंपरी शिवारातील शेतकरी अरूण दोधू कोळी (रा. आंबापिंपरी ता.पारोळा) हा शेतकरी अवैधरित्या गांजाची शेती करत होता. याबाबत जळगाव स्थानिक गुन्हा शाखा व पारोळा पोलिसांनी यांना गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनुसार त्याठिकाणी जळगाव स्थानिक गुन्हा शाखा व पारोळा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुमारे १२० किलो गांजा अंदाजे १२ लाख रूपयांचा गांजाची ओले व ताजे झाडे जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबर राहूल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेतकरी अरूण दोधू कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोली निरीक्षक बबन आव्हाड, पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याघटनेत संशयित आरोपी अरूण कोळी हा फरार झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहे.
दरम्यान, अशाच प्रकार जळगाव तालुक्यात देखील उघड झाला होता. हा प्रकार भोकर-पळसोद शिवारात सप्टेंबर महिन्यात घाडला होता. यात प्रकाश दशरथ सोनवणे (५८, रा. भोकर, ता. जळगाव) या शेतकऱ्याने कपाशीच्या शेतात गांजाच्या झाडाची लागवड केली होती. पोलिसांनी शेतात कारवाई करीत गांजाची २७ झाडं जप्त केली होती. याप्रकरणी शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.