जळगाव : देवगाव शिवारात शेतात झोळी करून झोपविलेली दोन वर्षीय बालिका रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना रविवार, ३ रोजी घडली होती. एलसीबी आणि तालुका पोलीस या मुलीच्या शोधात असताना मंगळवार, ५ रोजी दुपारी देवगाव शिवारातील गिरणा नदीपात्राजवळ तीन दगडीदेव परिसरात दगडाच्या कपारीमध्ये ही बालिका भुकेल्या अवस्थेत मिळून आली. तिला तत्काळ उपचारार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आमाश्या पावरा हा पत्नी, मुलगा व दोन लहान मुलींसह झेंडेअंजन (ता. शिरपूर) येथून कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी गेल्या सहा महिन्यांपासून देवगाव ( ता. जळगाव) येथे वास्तव्य करीत होता. ३ रोजी सकाळी आमाश्या हा शेतामध्ये कामाला जाताना दोन मुलांना सोबत घेऊन गेला होता. त्याची पत्नी हिराबाई आमाश्या हिच्या सोबत दोन वर्षांची मुलगी समीना ही होती. शेतकरी विनायक सोनवणे यांच्या शेतामध्ये शेतमालकाच्या पत्नी व सुनेसोबत शेतातील कापूस वेचण्यासाठी हिराबाई मजुरीने गेली होती. हे शेत गिरणानदी पात्राच्या वर आहे. दुपारच्या वेळी हिराबाई हिने जेवण केले. त्यानंतर तिच्या सोबतच्या दोन वर्षीय समीना हिला बांधावरील झाडाला साडीने झोका बांधून त्यामध्ये तिला झोपवून हिराबाई कापूस वेचणी कामाला निघून गेली. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास झोक्याजवळ आली असता तिला झोक्यामध्ये समीना दिसली नाही. तत्काळ तिने शेतमालकास ही माहिती दिली.
शेतमालकासह अन्य महिलांनी आजूबाजूच्या शेत शिवारात शोध घेतला असता समीना ही मिळून आली नाही. तिला कोणी तरी पळवून नेले म्हणून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. एलसीबी, तालुका पोलीस आणि आरसीपी यांच्या पथकाने सलग दोन दिवस देवगाव शेत परिसर पिंजून काढला, केळी बागा, कपाशीचे क्षेत्र, तुरीचे शेत पिंजून काढले. मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्राजवळील तीन दगडीदेव परिसरात दगडाच्या कपारीमध्ये ओल्या जागेत ही बालिका पथकासह मच्छीमार करणारा मगन परदेशी यांना दिसली. पथकाने तिला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. ही बालिका भुकेल्या अवस्थेत अशक्त अवस्थेत होती. पथकाने तिला तत्काळ खाऊ घातले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. या बालिकेला तिच्या आईवडिलांकडे तिला सुखरूप सुपूर्द केले. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तत्काळ पथक नेमले.
यांनी केली मोहीम फत्ते
अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, स. पो. नि. अनंत अहिरे, पो. उ. नि. गणेश वाघमारे, स. फौ. विजयसिंग पाटील, रवी नरवाडे, अतुल वंजारी, संजय हिवरकर, पो. हे. कॉ. जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, हिरालाल पाटील, विजय पाटील, भारत पाटील (एलसीबी) तसेच तालुका पोलीस ठाण्याचे पो. हे. कॉ. बापू पाटील, किरण आगोणे, नरेंद्र पाटील, प्रवीण कोळी, प्रदीप राजपूत तसेच आरसीपी यांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम फत्ते झाली. देवगावचे पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांचे या मोहिमेत सहकार्य लाभले.