Crime News: एअरगन बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात, एमआयडी पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव : येथील सुप्रीम कॉलनी परिसरात एअरगन बाळगून दहशत माजवणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. शुभम अनंता राऊत (वय २१, रा. भगवाचौक, सुप्रिम कॉलनी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांना सुप्रीम कॉलनी परिसरात एक तरुण एअरगन बाळगून दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी पथक तयार करुन शुभम राऊत याची अंगझडती घेतली, त्याच्याकडे एअरगन सापडली.

चौकशीदरम्यान, शुभमने आपल्या मित्र बंटी तायडे (रा. तायडे गल्ली) याच्याकडे एक गावठी पिस्टल असल्याची माहिती दिली. यावर पोलिसांनी बंटी तायडेचा शोध घेतला, परंतु तो घरात मिळून आला नाही. त्याच्या घराची झडती घेतली असता, एक गावठी बनावटीची पिस्टल सापडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शुभम राऊतला अटक केली आहे. बंटी तायडेचा शोध घेतला जात आहे.

 

सदर कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि पोलीस काँस्टेबल योगेश घुगे हे करत आहेत.