Crime News : पत्नीला मारून चकवा देणारा पती अखेर पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : झोपेतील पत्नीवर चाकूने डोक्यात व हातापायावर वार करून पतीने गंभीररीत्या जखमी केले. ही घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित पती वेगवेगळे ठिकाण बदलवून पोलिसांना चकवा देत होता. गोपनीय माहितीवरून शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) संशयित पती समाधान सपकाळे याला मुसळी फाट्याजवळ एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले.

जखमी महिलेवस ९२ टाके पडले होते. याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित पोलीस पतीच्या वाईट वागणुकीला कंटाळून मुलासह पत्नी विभक्त राहत होती. सोबत घरी चल असा पतीचा हट्ट होता. तसेच तो भांडत होता. ७ नोव्हेंबर रोजी पत्नी झोपली होती. पती समाधान सपकाळे पुन्हा घरी आला व पत्नीशी वाद घातला. मी तुझ्याकडे येणार नाही, मुलेही तुला देणार नाही, असे पत्नीने त्याला बजावले. यामुळे रागातून पती समाधान याने घरात पडलेला चाकू उचलत पत्नीच्या डोक्यावर, हातापायांवर सपासप वार करून जखमी केले. मोठा मुलगा हे भांडण सोडविण्यास गेला असता मुलालाही समाधान याने मारहाण करून पत्नी मृत झाल्याचे समजून खेडी येथून पळाला होता.

गल्लीतील लोकांनी जखमी महिलेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. महिलेवर उपचारात ९२ टाके टाकण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. मात्र संशयित पती हा सतत राहण्याची जागा बदल करत असल्याने त्याचा ठाव पोलिसांना लागत नव्हता. संशयित समाधान हा एरंडोलमार्गे मुंबईकडे पळून जात आहे, अशी गोपनीय माहिती शुक्रवारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार उपनिरीक्षक शरद बागल यांनी संशयिताचा मोबाइल क्रमांक प्राप्त करून त्याचे लोकेशन काढले असता, तो एरंडोलच्या दिशेत असल्याचे कळाले. त्यानुसार योगेश बारी, किशोर पाटील, छगन तायडे, किरण पाटील, नितीन ठाकूर यांचे पथक रवाना झाले. एकलग्न येथे सापळा रचून पथकाने रस्त्यावर दुचाकींची झडती घेतली. समोरून समाधान सपकाळे हा येताना दिसताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. याकामी पोलीस अधीक्षक कार्यालयातील गौरव पाटील, मिलिंद जाधव यांची वेळोवेळी तपास पथकाला मोबाइल व तांत्रिक विश्लेषणकामी मदत झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित तपास करीत आहेत.