---Advertisement---
समाज रचनेत विवाहसंस्था ही केवळ दोन व्यक्तींना नव्हे तर दोन कुटुंबांना, दोन संस्कृतींचा संगम मानली जाते. परंतु अलीकडलच्या काळात समाजात दिसणाऱ्या काही प्रवृत्ती या पवित्र नात्यापुढेच प्रश्नचिन्ह लावण्याचा प्रयत्न करत असतात. मुलांच्या तुलनेत कमी होत चाललेली मुर्तीची संख्या, सामाजिक अपेक्षांचे ओझे आणि त्यातून निर्माण झालेले विवाहाचे बदलते समीकरण यामुळे विवाहसंस्थेभोवती एक प्रकारचे व्यापारीकरण वाढताना दिसत आहे.
एक काळ होता… मुलीचे लग्न म्हटले म्हणजे वधू पित्यापुढे मोठे संकट उभे रहात असायचे. मुलीच्या लग्नासाठी घर-दार विकून मुलीचा लग्न सोहळ आटोपत असत. काळ बदलला मुलींची संख्या कमी झाल्याने वर पित्याकडून फारशा अपेक्षा नसल्याचेच लक्षात येत असते. मात्र बदलत्या या काळात विवाह संस्थेभोवती एक प्रकारचे व्यापारीकरण वाढताना दिसत आहे. काही दशकांपूर्वी मुलींची संख्या कमी होईल. याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतील असा वारंवार इशारा देऊनही फारसे परिणाम जाणवले नाही. त्यातच एकच अपत्य हवे आणि त्यातही मुलगाच हवा असा अनेकांचा प्रयास असायचा. वंशाचा दिवा…म्हणून मुलाकडे बघणारे आम्ही भविष्यातील संकटांकडे सतत दुर्लक्ष करत आलो आणि त्याचे परिणाम अतिशय गंभीरपणे भोगावे लागताय. दुर्दैवाने आज तीच भीती वास्तवात उतरताना दिसतेय. मुर्तीचे प्रमाण घटल्याने अनेक ठिकाणी योग्य वयात विवाह जुळणे कठीण झाले आहे. परिणामी काही लोकांनी यालाच एक प्रकारचा व्यवसायाचे स्वरूप दिले असल्याचे लक्षात येतयं. सर्वत्र दलालांची एकसाखळी तयार झाली आहे. या बरोबरच विवाह हा एक संस्कार नाही तर व्यवहार होत असल्याचे लक्षात येत आहे.
परिणामी आपण रोज एखादी तरी घटना हमखास ऐकत असतो किंवा वाचत असतो या पार्श्वभूमीवर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एका मुलीचे तीन ते चार ठिकाणी लग्न लावले जाणे असे प्रकार घडत असल्याचे लक्षात येत आहे. काही ठिकाणी बनावट कागदपत्रे खोटी ओळख आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे अशा विवाहांची नाटके उभे केले जात असतात. काही दिवस संसाराचा देखावा करून नंतर मुलगी आणि तिच्या मागे असलेले जाळे गायब होते. परिणामी संबंधित कुटुंब आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या उध्वस्त होते. अशा प्रकारांवरून अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होत आहेत. मात्र अशा टोळ्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करून पुन्हा पुन्हा तोच प्रकार करत असल्याच्या घटना उघडकीस येत आहे. ती परिस्थिती आता केवळ कायद्याचा प्रश्न नाही तरच सामाजिक अध:पतनाचे लक्षण झाले आहे.
विवाह हा विश्वास सन्मान आणि आयुष्यभराच्या सहजीवनाचा करार मानला जातो पण जेव्हा त्यात पैशांचा आणि फसवणुकीचा हस्तक्षेप वाढतो तेव्हा त्या नात्याची पवित्रता नष्ट होते. केवळ मुलींच्या कमी प्रमाणामुळे निर्माण झालेल्या असमतोलाचा गैरफायदा घेणारे काही घटक समाजात सक्रिय झालेले दिसून येताय… किती भयंकर हे प्रकार… एका मुलीचे चार चार ठिकाणी लग्न लावून दिले जाते. अगदी कालचीच घटना बघा ना मूळ अमळनेर तालुक्यात राहत असलेल्या एका युवकाने बाहेरील एका युवतीशी लग्न केले काही दिवस राहिल्यानंतर ही वधू घरातील अडीच लाखाची रोकड घेऊन पळून गेली. या प्रकरणी एजंट महिला तसेच त्या वधूवर गुन्हा दाखल झाला आहे. असे अनेक प्रकार सतत घडत असतात. यात काही जण पोलिसात तक्रार देतात तर काही बदनामीच्या भीतीने शांत बसून फसवणूक झाली म्हणून आता काय करणार? जाऊ द्या… हेच नशीबात असेल अशी भूमिका घेऊन त्या विषयावर बोलणेही टाळतात.
या समस्येच्या मुळाशी जातांना एक कठोर सत्य प्रत्येकाला स्वीकारावे लागणार आहे. हे लक्षात घेऊन विवाह हा व्यवहार नव्हे तर विश्वासाचा धागा आहे. ही जाणीव समाजाने पुन्हा दृढ करणे गरजेचे आहे. अन्यथा आज जे प्रकार अधूनमधून समोर येत आहेत, ते भविष्यातील संकटाची नांदी ठरेल हे लक्षात घ्यावे… मुलींचा सन्मान, त्यांचे शिक्षण आणि समान संधी यावर भर दिला गेला पाहीजे.









