---Advertisement---
शिवरायांबद्दलच्या बेताल वक्तव्याचा निषेध; स्मारकासमोर नाक घासून माफी मागण्याची मागणी
जळगाव/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार अवमानकारक आणि चुकीचे वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर महाराज) यांच्या कार्यक्रमांना महाराष्ट्र राज्यात तात्काळ बंदी घालावी, अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. सरकारने यावर बंदी न घातल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
शिवचरित्राचा अभ्यास नसताना बेताल वक्तव्ये
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, धीरेंद्र शास्त्री या माणसाचा शिवचरित्राबद्दल कोणताही अभ्यास नाही. असे असतानाही ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वेळोवेळी बेताल वक्तव्ये करून शिवप्रेमींच्या भावना दुखावत आहेत. अशा विकृत प्रवृत्तीच्या माणसाला महाराष्ट्राच्या मातीत पाय ठेवू देऊ नये आणि त्यांच्या कार्यक्रमांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी समस्त शिवप्रेमींच्या वतीने करण्यात आली आहे.
केवळ बंदीवर न थांबता, धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशातील कोणत्याही स्मारकासमोर जाऊन समस्त शिवप्रेमींची आणि महाराष्ट्र राज्याची नाक घासून माफी मागावी, अशी रोखठोक भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली आहे.
यावेळी शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोदभाऊ घुगे, प्रेमराज राठोड, मनसेचे प्रदिप पाटील, स्वप्निल राजपूत, किशोर धनगर, समाधान भोई यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व शिवप्रेमी उपस्थित होते.
”छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. धीरेंद्र शास्त्री यांच्या विकृत प्रवृत्तीला वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे.”
— शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पदाधिकारी









