सुरुंग पेरणाऱ्या बोटी नष्ट करा, ट्रम्प यांचे आदेश; पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता

---Advertisement---

 

वॉशिंग्टन : होर्मुझच्या सामुद्रधुनीत सुरुंग पेरणाऱ्या बोटी नष्ट करा, असा आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दिला. ट्रम्प यांच्या या नव्या आदेशामुळे परिस्थिती चिघळून पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिका-इराणसोबतच्या संभाव्य दुसऱ्या फेरीच्या चर्चेबाबत सुरू असलेल्या अनिश्चिततेच्या आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा आदेश जारी केला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये भूसुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही बोटीला तात्काळ नष्ट करा, असा आदेश त्यांनी दिला. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहचला असताना ट्रम्प यांच्या नव्या आदेशामुळे जगात चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे मध्यपूर्वेतील युद्ध लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे तेथील कोणत्याही लष्करी हालचालीचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि प्रादेशिक स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी गुरुवारी अमेरिकेच्या उपराजदूत नताली बेकर यांची भेट घेतली. इस्लामाबादमध्ये होणाऱ्या अमेरिका-इराण चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी ही भेट झाली. दोन्ही देशांना लवकरच वाटाघाटीच्या टेबलावर आणण्यासाठी तीव्र राजनैतिक प्रयत्न सुरू असतानाच ही बैठक झाली.

तणाव कमी करण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल

पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या एका निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रस्तावित शांतता चर्चा पुढे नेण्याच्या पर्यायांवर सविस्तर चर्चा केली. बैठकीदरम्यान, नकवी यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शस्त्रसंधी वाढवण्याच्या पुढाकाराचे स्वागत केले आणि तणाव कमी करण्याच्या दिशेने हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले. इराणकडूनही अशाच प्रकारच्या विधायक प्रतिसादाची त्यांनी आशा व्यक्त केली.

शांततेसाठी संवाद सुरू ठेवण्याची गरज

पश्चिम आशियामध्ये चिरस्थायी शांततेसाठी राजनैतिक संवाद सुरू ठेवण्याच्या गरजेवर दोन्ही बाजूंनी भर दिला. नकवी यांनी असेही सांगितले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न करत आहेत. चर्चेभोवती असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर या आठवड्यातील ही त्यांची दुसरी बैठक होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---