---Advertisement---
धार : मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाला मंदिर-कमल मौला मशीद हे सरस्वतीचेच मंदिर असून तेथे हिंदूंना पूजेचा अधिकार असल्याचा निकाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार भोजशाला मंदिर असल्याचे निष्पन्न होत असल्याने या जागेवर नमाज पठण करता येणार नाही, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट करत जैन समुदाय आणि मुस्लिम पक्षाच्या याचिका फेटाळून लावल्या.
ऐतिहासिक दस्तऐवज आणि पुरावे लक्षात घेता, या जागेवरील हिंदूंच्या पूजेचा हक्क कधीही संपुष्टात आलेला नाही, असे निरीक्षणही निकालावेळी न्यायालयाने नोंदवले. १२ मे रोजी न्यायालयाने या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला होता. भोजशाला प्रकरणात न्यायालयाने या परिसराला देवी वाग्देवीला समर्पित मंदिर म्हणून मान्यता दिली. तसेच, मशिदीच्या बांधकामासाठी मुस्लिम समुदायाला वेगळी जागा द्यावी, असे निर्देश राज्य सरकारला दिले. निकालानंतर धारमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भोज उत्सव समितीचे अध्यक्ष सुमित चौधरी यांनी न्यायालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त करत यास हिंदू समाजाच्या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाचा विजय म्हटले. ते पुढे म्हणाले, १९३५ मध्ये हिंदू भोज समितीची स्थापना करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या प्रश्नासाठी समर्पित केले होते.
हिंदू पक्षाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट केले दाखल
हिंदू पक्षाने धार भोजशाला संकुल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट याचिका दाखल केली. या याचिकेत मागणी करण्यात आली आहे की, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या कोणत्याही अपिलावर हिंदू पक्षाचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही आदेश पारित करू नये. ही कॅव्हेट जितेंद्र सिंह विशेन यांच्या वतीने वकील बरुण कुमार सिन्हा यांच्यामार्फत दाखल करण्यात आली आहे. जितेंद्र हे या प्रकरणातील सहावे याचिकाकर्ते होते, ज्यावर इंदूर येथील मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी आपला निकाल दिला.
भोजशाला संस्कृत शिक्षणाचे केंद्र
न्यायालयाने निकालात म्हटले की, ऐतिहासिक साहित्य आणि कागदपत्रांवरून स्पष्ट होते की, ही वास्तू जागा परमार राजवंशातील राजा भोज यांच्या काळातील भोजशाला असून, ते संस्कृत अध्ययनाचे एक प्रमुख केंद्र होते. राजा भोज यांच्या काळातील साहित्यिक आणि वास्तुकलेचे संदर्भ या ठिकाणी देवी सरस्वतीचे मंदिर अस्तित्वात असल्याचे दर्शवतात.
संकुलाला राजा भोज यांची मालमत्ता म्हणून मान्यता
धार भोजशाला प्रकरणासंदर्भात वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, इंदूर उच्च न्यायालयाने आपल्या ऐतिहासिक निकालात, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) चा ७ एप्रिल २००३ चा आदेश अंशतः रद्द केला. याशिवाय न्यायालयाने भोजशाला संकुलाला राजा भोज यांची मालमत्ता म्हणून मान्यता दिली. लंडनमधील संग्रहालयात असेलेल्या सरस्वतीच्या मूर्तीला परत आणण्यासंदर्भात सरकारला विचार करण्याचे निर्देश दिले.
निकालाला आव्हान देणार
मुस्लिम पक्षाच्या वतीने, शहर काझी वकार सादिक यांनी सांगितले की, न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर आणि त्यात काही त्रुटी आढळल्यास मुस्लिम समाज सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल. दुसरीकडे कमाल मौला मशीद नमाज इंतझामिया समितीचे प्रतिनिधी झुल्फिकार पठाण म्हणाले, आम्ही अद्याप आदेश वाचलेला नाही. आदेशाचा आढावा घेऊन निर्णय पुढील घेणार आहोत.
निकालातील महत्त्वाचे मुद्दे
- धार भोजशाला परिसर संरक्षित स्मारक असून ते एक मंदिर आहे
- हिंदूंना या ठिकाणी पूजा करण्याचा पूर्ण अधिकार
- सरकारने तेथे पुन्हा संस्कृत शिक्षणाची व्यवस्था करण्याचा विचार करावा
- वाग्देवीची (सरस्वतीची) मूर्ती भारतात परत आणून मंदिरात स्थापित करावी
- मुस्लिम पक्ष सरकारकडे मशिदीसाठी जागेची मागणी करू शकतो.









