---Advertisement---
मुंबई: नागपूरमधील एका धार्मिक कार्यक्रमानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या कथित ‘गुप्त’ भेटीच्या चर्चेवरही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
इतिहास आणि लोककथा यातील फरक ओळखणे आवश्यक: फडणवीस
धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “इतिहासात अशा प्रकारचा कोणताही ठोस दाखला उपलब्ध नाही. महापुरुषांभोवती अनेक लोककथा तयार होतात आणि त्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्वरूपात सांगितल्या जातात.”
फडणवीस यांनी पुढे नमूद केले की, रामायण आणि महाभारतासारख्या ग्रंथांमध्येही विविध लोकपरंपरा आढळतात, त्यामुळे अशा कथांना इतिहास म्हणून स्वीकारताना काळजी घेणे गरजेचे आहे. “आपण ज्या ऐतिहासिक ग्रंथांचा अभ्यास केला आहे किंवा जे अधिकृत संदर्भ उपलब्ध आहेत, त्यात अशा घटनेचा उल्लेख नाही. त्यामुळे लोककथा आणि इतिहास यातील फरक ओळखणे आवश्यक आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
मध्यरात्रीच्या ‘गुप्त’ भेटीच्या दाव्याचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध
राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मध्यरात्री ‘वर्षा’ निवासस्थानी गुप्त भेट झाल्याचा दावा काही माध्यमांकडून करण्यात आला होता. विशेषतः विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला मोठे उधाण आले होते.
या दाव्याचा पूर्णपणे इन्कार करताना फडणवीस म्हणाले, “जर भेट घ्यायची असेल तर ती उघडपणे घेता येते, लपून-छपून भेटण्याची कोणतीही गरज नाही. आमच्यात असे कोणतेही विषय नाहीत की जे लपवावे लागतील.” अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या कथित भेटीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली असून, ही भेट झाली की नाही हे संबंधित दोन नेतेच स्पष्ट करू शकतात, असे म्हटले आहे. तर भाजपकडून ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे सांगण्यात आले असून भाजप प्रवत्ते नवनाथ बन यांनीही अशा कोणत्याही भेटीचा इन्कार केला आहे.
सध्या राज्यात एकीकडे शिवाजी महाराजांबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य आणि दुसरीकडे राजकीय समीकरणांच्या चर्चांमुळे वातावरण चांगलेच तापले आहे.









