---Advertisement---
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात बियाणे, खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी कडकडीत बंद पाळत बेमुदत आंदोलनाला जोरदार पाठिंबा दर्शविला. या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष रणजीत राजपूत आणि माफदा (MAFDA)चे राज्य सचिव संजय अग्रवाल यांनी केले.
या बंदच्या माध्यमातून विक्रेत्यांनी अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांच्या विक्रीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. तसेच खत कंपन्यांकडून केली जाणारी ‘लिंकिंग’ पद्धत बंद करावी आणि अवैध कीटकनाशके व खतांची एजंटमार्फत होणारी विक्री रोखावी, अशी ठाम भूमिका मांडली.
याशिवाय ‘साथी’ पोर्टल ॲपद्वारे बियाणे विक्री सक्तीची करण्याचा निर्णय, किरकोळ विक्रेत्यांवर लादलेले कडक नियम, कीटकनाशक कंपन्यांकडून एक्सपायरी माल परत न घेणे आणि नवीन कायद्यांमुळे होणाऱ्या अडचणी याविरोधातही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात दोंडाईचा शहरातील अनेक कृषी विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार,” असा इशारा विक्रेत्यांनी दिला आहे.
या बंदमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खत आणि कीटकनाशके खरेदी करण्यात अडचणी येण्याची शक्यता असून, प्रशासनाने तातडीने या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.









