---Advertisement---
जळगाव : विमानतळ विकास प्रकरणातील कायदेशीर लढाईत जळगाव महापालिकेला सोमवारी मोठा धक्का बसला. सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया ने महापालिकेची याचिका थेट फेटाळून लावली, तर बॉम्बे हायकोर्ट आदेशाची अंमलबजावणी न केल्याने महापालिकेविरुद्ध न्यायालय अवमानाची कारवाई सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने १७ एप्रिल रोजी अटलांटा कंपनीला ११ कोटी रुपये देण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. या आदेशाविरोधात महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत महापालिकेला दिलासा नाकारला.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रक्कम न भरल्यामुळे महापालिकेविरुद्ध न्यायालय अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या प्रक्रियेसाठी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी दिल्लीत तळ ठोकला होता. मात्र, न्यायालयीन निर्णयामुळे महापालिकेला मोठा धक्का बसला असून, पुढील कायदेशीर पर्यायांबाबत प्रशासनाकडून विचार सुरू असल्याची माहिती आहे.









