---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील मद्यपींसाठी एक महत्त्वाची सूचना प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे. आगामी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे. या दिवशी सर्व प्रकारची किरकोळ मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत.
पोलीस अधीक्षकांकडून प्राप्त झालेल्या विनंतीनुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आंबेडकर जयंतीच्या दिवशी जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी कार्यक्रम, मिरवणुका आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक उपाय केला आहे.महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम १४२ (१) अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश लागू करण्यात आला आहे. आणि याच आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री परवान्यांवर बंदी लागू राहणार आहे. यामध्ये देशी आणि विदेशी मद्य विक्री करणारी दुकाने, परमिटरूम, बियर शॉप्स तसेच ताडी दुकाने यांचा समावेश आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाने आदेश काढताना स्पष्ट केले आहे की, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्व संबंधितांनी या आदेशाची गंभीरपणे दखल घेऊन त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनीही या दिवशी नियमांचे पालन करत शांततेत आणि शिस्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एकंदरीत, जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.









