विज पुरवठ्याअभावी दुचाकीच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ; धानोरा येथील स्मशानभूमीची विदारक स्थिती…!

---Advertisement---

 

चोपडा तालुक्यातील धानोरा येथील स्मशानभूमीत वीज पुरवठा नसल्याने एका मृतदेहावर दुचाकी आणि मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाईकांवर आली. गेल्या अनेक वर्षांपासून हीच विदारक स्थिती असून स्मशानभूमीत कायमस्वरूपी वीज पुरवठ्याची व पथदिव्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धानोरा येथील एका ग्रामस्थाचे निधन झाल्यानंतर रात्रीच्या वेळी अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडण्यात आली. मात्र, गावातील स्मशानभूमीत वीज पुरवठा नसल्याने रात्रीच्या गडद अंधारात अंत्यविधी कसा करावा, असा प्रश्न उपस्थितांना पडला होता. अखेर ग्रामस्थांनी आपल्या दुचाकी स्मशानभूमीच्या दिशेने उभ्या करून त्यांच्या हेडलाईटचा प्रकाश आणि मोबाईल टॉर्चचा वापर करून अंत्यविधी पार पाडला.

स्मशानभूमीत वीज नसल्याने होणारी ही कसरत नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती या ठिकाणी आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्मशानभूमी सारख्या संवेदनशील ठिकाणी साध्या विजेच्या दिव्याची सोय नसावी, ही बाब प्रशासनासाठी लाजीरवाणी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे प्रशासनाविरुद्ध मोठी नाराजी पसरली असून, संबंधित विभागाने किंवा ग्रामपंचायतीने आता तरी झोपेतून जागे व्हावे आणि स्मशानभूमीत कायमस्वरूपी वीज पुरवठ्याची व पथदिव्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी धानोरा ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---