---Advertisement---
धुळे ते नंदुरबार मार्गावर धावणाऱ्या शिवाई बसचा चिमठाणे बसस्थानकात अत्यंत भीषण अपघात झाला आहे. दि. 12 रोजी सकाळी सुमारे 11 वाजून 20 मिनिटांनी बस स्थानकातून निघत असतानाच हा थरकाप उडवणारा प्रकार घडला. बस सुटत असतानाच अचानक एका वृद्ध महिलेचा पाय बसच्या मागील चाकात अडकला. क्षणातच महिला तोल जाऊन खाली कोसळली. दुर्दैवाने महिलेचा पाय गुडघ्यापर्यंत बसच्या चाकाखाली आल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव लिलाबाई तुळशीराम सोनार (रा. शेवाळे) असून त्यांचे वय अंदाजे 60 वर्षे असल्याची माहिती आहे. सदर बस क्रमांक MH 49 BZ 8268 असून ती नंदुरबार आगाराची असल्याचे सांगण्यात येत आहे. बस चालक धनराज गिरासे तर वाहक पुष्पमाला संतोष पवार असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर बसस्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करत महिलेला रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.
या घटनेमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बस सुटताना आवश्यक दक्षता न घेतल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, पोलिस व संबंधित प्रशासनाकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू असून पुढील कारवाईसाठी अहवाल तयार केला जात आहे.









