जळगाव : शहरात चौकाचौकांमध्ये भाजीपाला विक्रते व्यवसाय करतात. त्यातील काही हॉकर्स त्यांच्या गाड्या रस्त्यावर लावतात, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. याचा त्रास वाहनचालक व पायी चालणाऱ्या नागरिकांना होत असतो. बळीराम पेठ व शनिपेठ येथे देखील मुख्य मार्गांवर हॉकर्स गाड्या लावतात. ही बाब लक्षात घेत शनिपेठ पोलीस स्थानकांत पोलीस निरीक्षक पदावर आलेल्या कावेरी कमलाकर यांनी अशा बेशिस्त हॉकर्सला शिस्त लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आज सोमवारी (१६ जून) त्यांनी स्वतः पायी फिरून सर्वांना तंबी दिली आहे.
जळगाव शहरांत दररोज शनिपेठ तसेच बळीराम पेठ भागांत मुख्य रस्त्यांवर भाजीपाला विक्रेते व्यवसाय करीत असतात. भाजीपाला विक्रेते रस्त्याच्या कडेला न उभे राहता भिंतीपासून ५ ते ७ फूट पुढे उभे राहत असल्याने जवळपास अर्धा रस्ता हॉकर्सने व्यापला जातो. त्यातच खरेदीसाठी येणारे नागरिक रस्त्यावर आपली वाहने उभी करत असल्याने बऱ्याचदा पायी चालण्यास देखील जागा शिल्लक नसते. शनिपेठ पोलीस ठाण्याकडून ये-जा करण्यासाठी हाच मुख्य मार्ग आहे.
निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी बाजारात फिरून रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना चांगलाच दम दिला. तसेच ८ ते १० भाजीपाला विक्रेत्यांचे वजन काटे देखील त्यांनी जप्त केले. बेशिस्त हॉकर्स आणि भाजीपाला विक्रेत्यांना कायमस्वरूपी शिस्त लावण्याची गरज असून कावेरी कमलाकर यांच्या कार्यकाळात बळीराम पेठ आणि शनिपेठचा मुख्य रस्ता आणि गल्ल्या मोकळा श्वास घेतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.