Suicide News: कर्जबारी शेतकऱ्याने गळफास घेत संपविली जीवन यात्रा

#image_title

जळगाव :  तालुक्यातील कुसूंबा गावातील एक कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. लीलाधर कौतिक पाटील (वय ४९) असे मृत शेतकऱ्याचे नाव  आहे.

लीलाधर पाटील आपल्या परिवारासह कुसुंबा येथे वास्तव्याला होते.  शेती आणि मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करीत होते. काही दिवसांपासून लीलाधर पाटील यांना रोजगार नव्हता.  त्यांनी खासगी कर्जही काढले होते. शिवाय शेतीतून उत्पन्न न आल्यामुळे कर्जफेडीची चिंता होती. त्यामुळे ते काही दिवसांपासून विवंचनेत होते.

दरम्यान, रविवारी त्यांच्या पत्नी सविता गावी गेल्या होत्या. तर त्यांचा ११ वर्षीय मुलगा चेतन हा बाहेर गेला होता. यामुळे लीलाधर पाटील घरात एकटेच होते. याच वेळी त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी साडेचारला त्यांचा मुलगा चेतन हा घरात आला असता त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. तो आक्रोश करीत घराशेजारी राहणाऱ्या काकांकडे आला व घटना सांगितली.

कुटुंबीयांनी केला आक्रोश 
त्यांच्या नातेवाइकानी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक गफूर तडवी तपास करीत आहेत. त्यांच्या मागे आई निर्मला, दोन भाऊ, तीन बहिणी, पत्नी सविता, मुलगा चेतन आणि मुलगी प्रांजल असा परिवार आहे.