शेतकऱ्याला एक लाख २० हजाराचा गंडा, एटीएम बदलून भामट्याने हातचलाखीत साधला डाव

---Advertisement---

 

जळगाव : मी तुम्हाला मदत करतो, असा बनाव करत भामट्याने शेतकऱ्याचे एटीएम अदलाबदल केले. त्यानंतर शेतकऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल एक लाख २० हजार ८१ रुपये काढुन घेतले. सोमवारी (६ एप्रिल) ते बुधवारी (८ एप्रिल) दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार भडगाव येथील बेडसर कॉम्पलेक्स येथील एटीएम मशीनच्या कॅबीनमध्ये घडला.

रतन वना पाटील (वय ८७, रा. वडगाव बु. ता. भडगाव) हे भडगाव येथील बडेसर कॉम्पलेक्स येथील एटीएम मशीनच्या कॅबीनमध्ये पैसे काढण्यासाठी आले होते. शेतकऱ्याला हेरत भामट्याने मदत करण्याचे दर्शवित त्यांच्याजवळ आला. मशीनमधुन पैसे काढण्यासाठी मी तुम्हाला मदत करतो, अशी थाप दिली. त्यानंतर शेतकऱ्याकडील एटीएम कार्डची हातचलाखीने त्याने अदलाबदल करुन घेतली. त्यानंतर भामट्याने शेतकऱ्याच्या खात्यातून रोकड परस्पर काढुन घेतली.

पैसे खात्यातून विड्रॉल केल्याचे संदेश मोबाइलवर प्राप्त झाल्यानंतर फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला. शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात बुधवारी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे हे तपास करीत आहेत.

सतर्क व्हा

शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना हेरत भामटे लक्ष ठेऊन असतात. बँकेच्या परिसरात नजर ठेऊन असणारे कोणीही कोणत्याही प्रकारची मदत करण्याचे सांगत असल्यास त्यावर लगेच विश्वास ठेऊ नका. त्याची मदत घेण्याला नकार द्या. कोणत्याही प्रकारे मदत हवी असल्यास थेट बँकेत जावुन कर्मचारी अथवा अधिकाऱ्याची मदत घ्या. ज्येष्ठ नागरिक आणि वयोवृध्द नागरिकांना ते तत्परतेने सहकार्य करतील. या नागरिकांची फसगत होणार नाही, याची काळजी बँकेकडून घेण्यात येईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---