---Advertisement---

प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी हतबल, जि.प. समोर आत्मदहनाचा प्रयत्न, पाहा व्हिडिओ

by team

---Advertisement---

जळगाव : लघु सिंचन विभागाच्या पाझर तलावातील पाण्याने सलग ४० वर्षांपासून शेती व पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे कर्जबाजारी झालो आहे. तरीही प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप करीत बोदवड येथील शेतकरी शांताराम रामकृष्ण कोळी व मनकरणाबाई रामकृष्ण कोळी यांनी .बुधवारी ४ जून रोजी सकाळी जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत त्यांना जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल पाटील यांच्या दालनात नेले. यावेळी अमोल पाटील यांनी त्यांची बाजू ऐकून घेत त्यांच्या शेतीकडे रवाना झालेत.

पोलिसांनी वेळीच रोखल्याने टळला अनर्थ

शांताराम कोळी यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने सकाळपासूनच पोलिसांनी जिल्हा परिषद येथे बंदोबस्त लावला होता. कोळी हे त्यांच्या आई मनकरणाबाई रामकृष्ण कोळी, मुलासोबत जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या सोबत पिशवीतून आत्मदहन करण्यासाठी पेट्रोल आणले होते. पिशवीतून पेट्रोलची बाटली काढण्याचा प्रयत्न करीत असतांना पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी कोळी यांनी वारंवार पाठपुरावा करुन देखील माझ्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने आपण आत्मदहन करु असा इशारा पोलिसांना दिला. याप्रसंगी पोलिसांनी त्यांची समजूत काढत त्यांना आत्मदहनापासून परावृत करीत कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांच्या दालनात नेण्यात आले.

---Advertisement---

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर व्यक्त केला रोष

शांताराम कोळी यांनी आपण केवळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच चर्चा करु असे ठामपणे सांगितले. परंतु, मुख्य कार्यकारी अधिकरी ह्या दौऱ्यावर गेल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उत्तराने कोळी यांनी संतप्त होत मी आत्मदहनची पूर्व कल्पना देऊन देखील मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने त्यांना शेतकऱ्यांची पर्वा नसल्याचे यातून दिसून येत असल्याचा आरोप कोळी यांनी यावेळी केला.

शांताराम कोळी यांची बोदवड बोदवड शिवारात गट क्र. ३०४/१ हे शेत आहे. त्याला लागून लघु सिंचन विभागाने सन १९८२ मध्ये पाझर तलावाची निर्मिती केली. कोळी यांच्या शेतातून मोठा नाला गेला आहे. त्यामुळे पाऊस झाल्यावर तलावाचे पाणी त्यांच्या शेतात शिरून पिकांचे नुकसान होते. गेल्या ४० वर्षांत अनेकदा असे प्रकार होऊन नुकसान झाले आहे.

या नुकसानीचे वेळोवेळी पंचनामे सुद्धा झाले आहेत. लघु सिंचन विभागाने शेताची लेव्हलही घेतली असून संपूर्ण शेतात तलावाचे पाणी शिरते. तरीही लघु सिंचन विभाग पर्यायी शेत रस्ता सुद्धा दिला नाही. मनरेगाच्या माध्यमातून तलावातील गाळ कोळी यांच्या शेतात टाकण्याचे काम मंजूर झाले होते. पण, पंचायत समितीने सहकार्य केले नाही. पाझर तलाव निर्मितीत त्यांचा शेतरस्ता बुडीत क्षेत्रात गेला. पर्यायी शेतरस्ता देणे बंधनकारक होते. पण आजपावेतो शेतरस्ता मिळालेला नाही. त्यामुळे इतरांच्या विनवण्या करून फेऱ्याने ये-जा, साहित्य वाहतूक करावी लागते. नुकसान भरपाई देत नाही. शिवाय या प्रकाराबाबत महसूल विभाग, लघुसिंचन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा करूनही दिलासा मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल पाटील यांनी तरुण भारतशी बोलतांना सांगितले की, शांताराम कोळी यांचे जे नुकसान झाले आहे, ते भविष्यात पुन्हा होऊ नये याकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. संबंधित काम पूर्ण करुन पुढील वर्षी त्यांचे नुकसान होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. त्यांचे प्रकरण ४० वर्षांपासून प्रलंबित आहे. याकरिता उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करु. प्राथमिक स्वरुपात काय करता येईल याबाबत प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पाहणी करणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---