---Advertisement---
अमळनेर शहरात शनिवारी सकाळी एक भीषण अपघात घडल्याने काही काळ खळबळ उडाली. धुळे-नागपूर महामार्गावरील धान्य बाजार परिसरात वाळूने भरलेला सहा चाकी डंपर उलटल्याची घटना घडली. या अपघातात रस्त्यावरील दुभाजक आणि वीजखांबाचे मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 41 एटी 7779 क्रमांकाचा डंपर अमळनेरकडून धुळेच्या दिशेने जात होता. सकाळी सुमारे साडेआठच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डंपरने प्रथम रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडक दिली. त्यानंतर वाहन दुभाजकावर चढून उलटले आणि पुढे जाऊन वीजखांबालाही धडक दिली.
या अपघातात रस्त्यावरील दुभाजक पूर्णपणे तुटला असून वीजखांबालाही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.
दरम्यान, शहरातून मोठ्या प्रमाणावर वाळूने भरलेली जड वाहने भरधाव वेगाने धावत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या वाहनांमुळे यापूर्वीही परिसरात अपघाताच्या घटना घडल्या असून नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नागरिकांच्या मते, जर वाळूचे अधिकृत ठेके सुरू नसतील तर शहरातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक कशी सुरू आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या वाहनांना नेमके कुणाचे संरक्षण आहे, अशीही चर्चा शहरात रंगू लागली आहे.
स्थानिकांनी महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अवैध वाळू वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, तसेच शहरातून धावणाऱ्या जड वाहनांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी केली आहे.









