---Advertisement---
धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलिसांनी गहाणखत करून देण्याचे आमिष दाखवत चारचाकी वाहन लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत परराज्यातून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली असून एकूण सुमारे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
निजामपूर पोलीस ठाणे हद्दीतील इंदवे गावातील फिर्यादी दिनेश सदाशिव महाले यांनी २२ फेब्रुवारी रोजी आपली मारुती सुझुकी कंपनीची इर्टिगा (क्र. GJ 15 CJ 4490) गहाण ठेवण्याच्या उद्देशाने काही व्यक्तींशी व्यवहार केला होता. आरोपींनी गहाणखत करून देण्याचे आश्वासन देत सुमारे ३ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केली आणि फिर्यादींच्या घरासमोरील अंगणातून त्यांना कोणतीही माहिती न देता वाहन लंपास केले. या प्रकरणी २६ फेब्रुवारी रोजी निजामपूर पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची सूत्रे सहायक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांनी हाती घेतली. गोपनीय व तांत्रिक माहिती तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान सुरेंद्रभाई ईश्वरभाई पटेल, प्रदीपभाई दशथभाई पटेल (दोन्ही रा. नवसारी, गुजरात) आणि जितेनभाई मनुभाई पटेल (रा. करदिवा फलिया, मालवन, ता. जि. वलसाड, गुजरात) या तिघांना नवसारी (गुजरात) येथून ताब्यात घेण्यात आले.
२७ फेब्रुवारी रोजी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान आरोपींकडून ७ लाख रुपये किंमतीची इर्टिगा तसेच गुन्हा करताना वापरलेली सुमारे २ लाख रुपये किंमतीची मारुती सुझुकी वेगनर (क्र. GJ 21 CC 1442) जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निजामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय साधत ही यशस्वी कारवाई केली.
या घटनेमुळे गहाणखताच्या व्यवहारांमध्ये नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पोलिसांकडून आरोपींच्या इतर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास सुरू आहे.









