गॅस टंचाईचा फटका शिक्षण क्षेत्राला; मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जळगावातील वस्तीगृहांना गॅस सिलेंडरचा पुरवठा….!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यात गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका आता शैक्षणिक क्षेत्रालाही बसल्याचे चित्र समोर आले होते. विशेषतः महाविद्यालयीन वस्तीगृहांमध्ये स्वयंपाकाचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर आता या समस्येवर तोडगा निघाल्याचे दिसून येत आहे.

जळगाव शहरातील एका महाविद्यालयीन वस्तीगृहात सुमारे ४२५ विद्यार्थिनी राहत आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून या वस्तीगृहाला गॅस सिलेंडरचा पुरवठा झाला नव्हता. त्यामुळे विद्यार्थिनींसाठी स्वयंपाक करणे मोठे आव्हान बनले होते.

वस्तीगृह प्रशासनाने संबंधित गॅस एजन्सीकडे अनेक वेळा संपर्क साधून सिलेंडरची मागणी केली होती. मात्र एजन्सीकडून बुकिंग घेण्यासही टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला. सिलेंडरचा पुरवठा न झाल्यास इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थिनींसाठी जेवण बनवणे जवळपास अशक्य होईल, अशी स्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान, वस्तीगृह प्रशासनाने शेवटचा पर्याय म्हणून चुलीवर स्वयंपाक करण्याचे नियोजन केले होते. तसेच डिझेल शेगडीचा पर्यायही विचारात घेण्यात आला होता. मात्र विद्यार्थिनींच्या परीक्षा सुरू असल्यामुळे त्यांना घरी पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत शैक्षणिक वस्तीगृहांना प्राधान्याने गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्याचे आदेश दिले. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे त्यांचा स्वयंपाकाचा प्रश्न तातडीने सोडवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर संबंधित गॅस एजन्सीकडून वस्तीगृह प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला आणि सिलेंडरचा पुरवठा सुरू करण्याबाबत कळवण्यात आले. सुरुवातीला दोन सिलेंडर पाठवण्याची माहिती देण्यात आली असून पुढील काळात नियमित पुरवठा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गॅस सिलेंडर उपलब्ध झाल्यामुळे वस्तीगृहातील स्वयंपाकगृहाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला असून विद्यार्थिनींना दिलासा मिळाला आहे. शैक्षणिक क्षेत्राला प्राधान्य देत प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागतही केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---