---Advertisement---
जळगाव: सध्या आखाती देशांमधील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. भारतातही याचे पडसाद उमटत असून सर्वसामान्यांना एका सिलेंडरसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. नेमक्या याच टंचाईचा फायदा घेत चोरट्यांनी आपला मोर्चा आता गॅस गोदामांकडे वळवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूर येथील ‘श्रीधर गॅस एजन्सी’च्या गोदामावर चोरट्यांनी मध्यरात्री धाड टाकून १०० भरलेले सिलेंडर चोरून नेले आहेत. पिंपरुड शिवारात ललित राणे यांचे हे भारत गॅसचे अधिकृत गोदाम आहे. शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास राणे यांची पत्नी मृणाल आणि कर्मचारी दामोदर असटकर यांनी गोदाम व्यवस्थित बंद केले होते. त्यावेळी गोदामात १४.२ किलो वजनाचे एकूण २०९ भरलेले सिलेंडर साठवलेले होते.
चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गोदामाच्या मुख्य गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर सुमारे ३ लाख ११ हजार ८०० रुपये किमतीचे १०० सिलेंडर अवघ्या काही तासांत गायब केले. इतक्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर वाहून नेण्यासाठी चोरट्यांनी मोठ्या वाहनाचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलीस गस्तीवर प्रश्नचिन्ह
हे गोदाम मुख्य रस्त्याला लागून असूनही आणि पोलिसांची गस्त सुरू असतानाही इतकी मोठी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गोदामातून इतक्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल लंपास झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
सध्या अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गॅस वितरकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.









