---Advertisement---
महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या जळगावकरांसाठी आणखी एक आर्थिक धक्का बसणार आहे. जळगाव जिल्हा दूध संघ यांनी १ मार्च २०२६ पासून ‘गोल्ड’ दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार एक लिटर आणि पाच लिटरच्या पाऊचवर प्रति लिटर एक रुपयांची वाढ लागू होणार आहे. मात्र अर्धा लिटरच्या पाऊचचा दर पूर्ववत ठेवण्यात आला आहे.
संघाच्या माहितीनुसार, मागील वर्षभरात शेतकऱ्यांकडून खरेदी होणाऱ्या दुधाच्या दरात सात रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यापूर्वी सुमारे अडीच महिन्यांपूर्वी विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. तरीही खरेदी आणि विक्री दरामधील सुमारे पाच रुपयांचे अंतर कायम राहिले आहे.
ही आर्थिक तफावत भरून काढण्यासाठी तसेच संघाचा ताळमेळ राखण्यासाठी दरवाढ अपरिहार्य ठरल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मार्चपासून ग्राहकांना ‘गोल्ड’ दूधासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. तथापि, अर्धा लिटर पाऊचच्या दरात बदल न केल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.









