---Advertisement---
जळगांव, धुळे, नंदुरबार आणि पुणे विभागातील प्रवाशांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आता अखेरचा टप्पा गाठताना दिसत आहे. उधना–पुणे स्पेशल ट्रेनचा प्रस्ताव सध्या निर्णायक अवस्थेत पोहोचला असून, लवकरच यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे. ही प्रस्तावित ट्रेन ताप्ती सेक्शन (नंदुरबार–जळगांव–मनमाड) मार्गे धावणार असून, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील हजारो प्रवाशांना थेट लाभ मिळणार आहे.
या महत्त्वपूर्ण प्रस्तावासाठी खासदार स्मिताताई वाघ यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी पश्चिम रेल्वे प्रशासनाशी औपचारिक पत्रव्यवहार करत पुणे व भुसावल रेल्वे डिव्हिजनकडे प्रस्ताव पुढे नेला. यामुळे प्रशासनिक स्तरावर प्रस्तावाला गती मिळाली.
धरणगांव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष व पश्चिम रेल्वेच्या DRUCC सदस्य महेंद्र कोठारी यांनी सातत्याने उच्च अधिकाऱ्यांशी संवाद साधत प्रस्तावासाठी पाठपुरावा केला. पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक, डीआरएम आणि परिचालन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून, संचालनातील अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.
मुंबई सेंट्रल विभागातून तयार झालेला प्रस्ताव पश्चिम रेल्वे मुख्यालय, चर्चगेट येथे मंजूर करण्यात आला असून, तो सध्या मध्य रेल्वे मुख्यालय, मुंबई येथे विचाराधीन आहे. सर्व तांत्रिक व वेळापत्रकासंदर्भातील बाबींचा अभ्यास पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
उधना–पुणे स्पेशल ट्रेन सुरू झाल्यास –
पुणे व सूरतकडे थेट रेल्वे संपर्क
मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगांव परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा
तिकीट वेटिंगमध्ये मोठी घट
व्यापार, शिक्षण, रोजगारासाठी सोयीस्कर प्रवास
धुळे, जळगांव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना थेट लाभ
उधना- नवापूर – नंदुरबार- दोंडाईचा – शिंदखेडा – नरडाणा – अमळनेर – धरणगाव – जळगाव – पाचोरा – चाळीसगाव – मनमाड – कोपरगाव – अहिल्यानगर – दौंड – मार्गे पुणे अशी ही ट्रेन धावल्यास शिर्डी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा वेळ वाचणार असून ट्रेन बदलण्याची गरजही कमी होणार आहे.
धरणगांव तालुका प्रवासी मंडळाने नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. आता सर्वांचे लक्ष अंतिम निर्णयाकडे लागले असून, उधना–पुणे स्पेशल ट्रेन लवकरच प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता आहे.









