---Advertisement---
शिव कॉलनी परिसरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने २२ मार्च २०२६ रोजी भव्य हिंदू संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या निमित्ताने शिवकाली स्टॉप येथून आकर्षक सजीव देखावे सजवून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला, त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय आणि उत्साही वातावरणाने भारून गेला होता.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ह.भ.प. अंकुश महाराज मनवेलकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणातून हिंदू धर्माचे मूल्य, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचे महत्त्व स्पष्ट केले. याशिवाय जिल्हा सेवा मंडळाचे सदस्य गिरीश कुलकर्णी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा आढावा घेत ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनेविषयी माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान हिंदू समितीचे अध्यक्ष भरत दादा बराटे यांनी भगवद्गीतेचे महत्त्व अधोरेखित करत तिच्या तत्त्वांचा दैनंदिन जीवनात अंगीकार करण्याची गरज व्यक्त केली.
या संमेलनाच्या आयोजनासाठी शिवकाली परिसरातील अनेक दानशूर नागरिकांनी आर्थिक तसेच प्रत्यक्ष मदतीचा हातभार लावला. त्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या आणि आनंददायी वातावरणात पूर्ण झाला. उपस्थितांनीही या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.









