---Advertisement---
भुसावळ शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम गॅस पुरवठ्यावर झाल्याचे सांगत काही वितरकांकडून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे.
हॉटेल व्यवसायासाठी दररोज नाश्ता व जेवण तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅस सिलेंडरची आवश्यकता असते. मात्र सध्या सिलेंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेल चालक अडचणीत सापडले आहेत. गॅस उपलब्ध नसल्यास हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, अशी भीतीही व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
काही हॉटेल चालक पर्यायी उपाय म्हणून लाकडी कोळशाचा वापर करण्याचा विचार करत आहेत. मात्र हा पर्याय खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने त्यातूनही अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.
या परिस्थितीमुळे शहरातील हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होत असून गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत अनेक हॉटेल बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









