---Advertisement---
भुसावळ : “मी मराठी बोलतो, मला मराठी समजते… या माझ्या रिक्षात बसा!” असा ठळक संदेश देणारे पोस्टर लावण्याचे अभियान महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) तर्फे भुसावळ शहरात उत्साहात राबविण्यात आले. शहरातील रिक्षाचालकांच्या वाहनांवर हे पोस्टर लावून मराठी भाषेचा सन्मान राखण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राज्यातील रिक्षा, टॅक्सी तसेच ॲप-आधारित सेवा चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ होऊन स्थानिक भाषेला प्राधान्य मिळणार आहे.
या पार्श्वभूमीवर मनसेने भुसावळमध्ये जनजागृतीचा पुढाकार घेतला. विविध भागांत पदाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांशी संवाद साधत मराठी भाषेचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, शहरातील अनेक रिक्षाचालकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “आम्ही मराठी बोलतो आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे,” असे सांगत चालकांनी आपल्या रिक्षांवर पोस्टर लावले.
राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर अशा उपक्रमांना वेग मिळत असून, मराठी भाषा व संस्कृतीच्या जतनासाठी कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.
या अभियानामुळे शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी होण्याबरोबरच मराठी भाषेविषयी अभिमान आणि जागरूकता वाढण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
या उपक्रमात जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, तालुकाशहराध्यक्ष दीपक कोळी व अन्य पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.









