जळगाव : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारीही निवडणुकीच्या कामांत व्यस्त आहे. दुसरीकडे कापूस उत्पादकांची व्यापा-यांकडून लुबाडणूक केली जात आहे. दिवाळीपूर्वीच सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र २० नोव्हेंबरपर्यंत सुरू न केल्यास २१ नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितले की, खान्देशात कापूस उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. नगदी पीक म्हणून कपाशीची लागवड जास्तीत जास्त प्रमाणात जळगावसह खान्देशात केली जाते. मात्र , लहरी हवामान, अळीचा प्रादुर्भाव गुलाबी बोंड वाढल्यामुळे यावर्षी कापूस उत्पादनात घट येत आहे. खुल्या बाजारात कापसाचे भाव प्रतिक्विंटल ६,२०० ते ६,५०० रुपयांपर्यंत कापसाचे सौदे व्यापारी करीत आहेत. दरवर्षी कापसाचे हमीभाव शासन ठरवत असते. मात्र, हमीभाव फक्त कागदावरच असतात. हमीभावात कोणत्याही शेतीमालाची खरेदी केली जात नाही. कापसाचा हमीभाव प्रतिक्विटल ७,५७८ रुपये असतानाही शासन खरेदी नसल्याने कापूस उत्पादकांना नाडले जात आहे. प्रत्येकाच्या घरात वैद्यकीय खर्च, सार्वजनिक कार्यक्रम तसेच शैक्षणिक खर्च, त्यासोबतच शेताला लागणारा खर्च हे पैसे चुकते करायचे असल्याने कापूस उत्पादकांना गावात येणाऱ्या व्यापाऱ्यांना कमी भावात कापूस विकावा लागत आहे. अशी स्थिती आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
शासनाने दिवाळीपूर्वीच सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दिवाळी संपली. शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले, तरीही सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू होत नसल्याची स्थिती आहे. आता २० नोव्हेंबरपर्यंत सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करावेत; अन्यथा २१ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही विभागीय अध्यक्ष पाटील यांनी दिला.
कापूस, मका शेतकऱ्यांच्या घरात पडून
शेतकऱ्यांचे मरण काही केल्या थांबायला तयार नाही. आधीच अतिपावसाने व अवकाळीने कापूस, मका उत्पादकांचे उत्पादन ३० टक्क्यांवर आले आणि ते विकणेही आता शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना कापूस असो की मका किंवा कोणतेही शेतमजुरीचे काम, त्याला मजुरीला रोख पैसे द्यावे लागतात. आता शेतकऱ्यांच्या घरात कापूस, मका साठून आहे. व्यापारी सद्यःस्थिती शेतमाल रोखीने घ्यायला तयार नाहीत. व्यापाऱ्यांकडून शेतमाल कमी भावात मागतो अथवा उधारीने मागतो. उधारीत पैसे बुडाल्याने व्यवहार करायला हिम्मत होत नाही. कुणी काहीही म्हटले तरी शेतकऱ्यांना रोखीने व्यवहार करणे, हा त्यांचा नाइलाज आहे. यावर्षीच्या अस्मानी-सुलतानी संकटे आत्याने खान्देशातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेली, असे शेतकरी नेते एस. बी. नाना पाटील यांनी सांगितले.