---Advertisement---
मुंबई: रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेले असताना, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी सत्ताधारी भाजप आणि मनसेवर जोरदार निशाणा साधला आहे. “जर परप्रांतीय लोक मुंबई सोडून गेले, तर अर्धी मुंबई रिकामी होईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीलाही स्वतःच्या घरची कामे स्वतः करावी लागतील,” अशी मिश्किल पण खोचक टिप्पणी त्यांनी केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना करुणा मुंडे यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणाऱ्या मराठी भाषेच्या सक्तीला विरोध दर्शवला.
आपल्या वैयक्तिक अनुभवाचा दाखला देत करुणा मुंडे म्हणाल्या की, “मी धनंजय मुंडे यांच्यासोबत २७ वर्षे राहिले, तरीही मला मराठी नीट येत नव्हती. दोन वर्षांपूर्वी राजकारणात आल्यानंतर मी मराठी शिकले. मराठी भाषा खरोखर कठीण आहे. मुंबईत अनेक परप्रांतीय रिक्षाचालक आहेत, कारण मराठी माणसे या व्यवसायात तुलनेने कमी आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांना मराठीची सक्ती करू नका, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करणार आहे.”
’भोंदू बाबां’वरही साधला निशाणा
यावेळी त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यासह अनेक अध्यात्मिक गुरूंवरही कडक शब्दांत टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी त्यांनी धीरेंद्र शास्त्रींचा समाचार घेतला. “असे स्वयंघोषित बाबा लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवतात. राजकीय आश्रयामुळेच हे लोक मोठे होतात. धीरेंद्र शास्त्रींची महाराजांवर बोलण्याची लायकी नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच, शास्त्रींना त्यांनी ‘वन टू वन’ चर्चेचे आव्हानही दिले आहे.









