---Advertisement---
भुसावळ येथील बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीचा सुळसुळाट झाला असून, संबंधित यंत्रणांच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकार दिवसेंदिवस अधिकच बळावत आहे. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरूनच खासगी वाहनांद्वारे बिनधास्तपणे प्रवासी वाहतूक केली जात आहे.मात्र रेल्वे प्रशासन,एसटी महामंडळ व वाहतूक शाखा यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नियम तोडणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे.
बसस्थानक परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरू असून क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी कोंबून मुक्ताईनगर, बोदवड, यावल, फैजपूर, सावदा, जामनेर व जळगाव या मार्गांवर प्रवासी वाहून नेले जात आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून ही वाहतूक सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. नियमबाह्य वाहतुकीमुळे अधिकृत एसटी सेवेलाही मोठा फटका बसत आहे.
आता तर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांमध्ये खुलेआम प्रवासी भरले जात आहेत. रेल्वे स्थानकाच्या समोरील परिसरात पार्किंगला स्पष्ट बंदी असतानाही येथे प्रवासी वाहने उभी राहत असून, चढ-उतार सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक व स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
बसस्थानकाचे स्थलांतर तात्काळ शक्य नसले, तरी लांब पल्ल्याच्या मार्गावरील एसटी बसेससाठी नाहाटा चौफुली येथे स्वतंत्र ‘टचिंग पॉइंट’ सुरू करणे अत्यावश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे. या ठिकाणी आधीच काँक्रिटीकरण झाले असल्याने हा निर्णय तात्काळ अंमलात आणता येऊ शकतो. यामुळे शहरांतर्गत वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना अधिक सुरक्षित व सोयीस्कर सेवा मिळू शकते.
दरम्यान, अवैध प्रवासी वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करून प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी घ्यावी, अन्यथा एखाद्या दुर्घटनेनंतर जाग येणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.









