---Advertisement---
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने मागील काही दिवसांपासून भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. जगभरात तणाव निर्माण करणारी परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, जागतिक स्तरावर मोठ्या युद्धाची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता या तणावाला तात्पुरता ब्रेक लागला असून अमेरिका इराण मध्ये दोन आठवड्यांचा तात्पुरता युद्धविरामाची घोषणा ही करण्यात आली आहे. आणि याचाच थेट परिणाम जागतिक तसेच भारतीय बाजारांवर दिसून येतोय.
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणवर तातडीने हल्ला न करण्याचा निर्णय घेत पुढील दोन आठवड्यांसाठी युद्धबंदीची घोषणा केली. यासोबतच इराणकडून आलेल्या प्रस्तावांनाही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
दरम्यान युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली आहे. विशेषतः सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी 1,47,500 रुपये असलेला सोन्याचा भाव बुधवारी 4 हजार रुपयांनी वाढून थेट 1,52,500 रुपयांवर पोहोचला. तर चांदीच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ झाली असून, ती 2,47,000 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढल्याचं स्पष्ट दिसत आहे.
दुसरीकडे, BSE Sensex आणि Nifty 50 यांनीही जोरदार उसळी घेतली. सेन्सेक्सने प्री-ओपनिंग सत्रातच 2700 अंकांची झेप घेतली, तर निफ्टी 750 अंकांनी वधारला. आयटी, मेटल आणि रिअल्टी क्षेत्रात विशेष तेजी दिसून आली. याशिवाय कच्च्या तेलाच्या दरातही सुमारे 13 टक्क्यांची घसरण झाली असून, ते 95 डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत.
थोडक्यात, युद्धाची शक्यता कमी होताच बाजारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र पुढील काही दिवसांत परिस्थिती कशी बदलते, यावरच सोनं-चांदी आणि शेअर बाजाराची दिशा ठरणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध राहून निर्णय घेणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.









