जळगाव, : दिवाळी सणाच्या पर्वात एस. टी. परिवहन महामंडळाला लक्ष्मी पावल्याचा सुखद प्रत्यय जळगाव आगाराला आला आहे. दीपोत्सवातील चार दिवसात लालपरीला ३ कोटी ६९ लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न लाभले. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा कल लक्षात घेऊन ४०० ते ५०० जादा बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. भाऊबीज सण आटोपला. त्यामुळे आता आठ दिवस पुन्हा परतीच्या प्रवासात एसटी बसेस गर्दीने खचाखच भरून धावणार आहेत.
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे एस.टी. शहरात, खेड्यापाड्यात प्रवाशांसाठी निरंतर धावते आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि प्रवासी यांच्यासाठी ही लालपरी सर्वाधिक सुरक्षित ठरली आहे. समाजातील अनेक घटकांना सवलत देत लालपरी सामाजिक दायित्वाची जबाबदारीसुद्धा पार पाडत आहे. दिवाळी सणात प्रवाशांना गावाला जाण्या-येण्यासाठी जळगाव आगारात सुरुवातीलाच नियोजन करून जादा गाड्यांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या. विशेष म्हणजे जादा बसेसही प्रवाशांनी हाऊसफुल्ल होऊन धावत असल्याचे चित्र यंदाच्या दिवाळीत दिसून आले. त्यामुळे अवघ्या चार दिवसात आगाराला तब्बल ३ कोटी ६९ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले. नागपूर, मेहकर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक येथे जादा बसेस सोडून फेऱ्या वाढविण्यात आत्या. सुरत येथेही जादा बसेस पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. यामुळे लालपरीचे उत्पत्र मोठ्या प्रमाणात वाढले. एसटीमधून प्रवास हा सर्वाधिक सुरक्षित असतो. अप्रिय घटनेत एसटीकडून मदतीचा हात लाभत असतो. ही भावना प्रवाशांमध्ये वृद्धिंगत होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस एसटीच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. एसटी नेहमी वेळेवर सुटते आणि वेळेवर पोहचण्यासाठी कार्यरत असते. प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत नाही, यातच एसटीचे यश सामावले असल्याची भावना अनेक वाहन चालक, तसेच वाहक यांनी व्यक्त केली.
भाडेवाढीमुळे खाजगी वाहनांकडे पाठ
सण उत्सव आला की, खाजगी वाहने, लक्झरी यांच्या तिकिटांच्या दरात अचानक वाढ केली जाते. हे भाडे अधिक वाटत असल्याने तसेच सुरक्षिततेची खात्री पटत नसल्याने
असंख्य प्रवासी लालपरीकडे आकर्षित होत आहेत. स्पर्धेच्या काळात लालपरीने बहुजन हिताय बांधिलकी जोपासत अविरत सेवा देत प्रवाशांनाही आकर्षित केले. हे यंदाच्या दिवाळीत प्रकर्षाने दिसून आले. त्याचीच परिणती म्हणून दररोज कोटीच्या घरात उत्पन्न गेले.
मौल्यवान वस्तूंची स्तूंची घ्या काळजी
स्थानकात किंवा परिसरात बस लागल्यानंतर चढण्यासाठी प्रवासी दरवाजामध्ये गर्दी करतात. या गर्दीचा फायदा घेत चोरटे महिलांचे दागिने, रोकड, मोबाईल असा मुद्देमाल लांबविण्याच्या तयारीत असतात. असे प्रकार होऊ नयेत, यासाठी प्रवाशांनी, विशेषतः महिला, तरुणींनी अधिक सजग राहावे, सावकाश बसमध्ये चढावे. यामुळे चोरट्यांच्या उद्देशाला लगाम बसू शकेल, असे आवाहन विभाग नियंत्रक जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
एक आठवडा गर्दीचाच !
दिवाळी संपली असली तरी पुन्हा आठवडाभर परतीच्या प्रवाशांची गर्दी कायम असणार आहे. सध्या दररोज एक कोटीचे उत्पन्न एसटीला मिळत आहे. तीन दिवसात ३ कोटी ६९ लाखांचे उत्पन्न झाले. महिला, ज्येष्ठ नागरिकांना सवलत ही योजना सुरू असली तरी एसटीच्या उत्पन्नात दिवाळीत मोठी वाढ झाली आहे.
भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव आगार