मुद्यांची निवडणूक आली गुद्यांवर, शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या पतीला मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा

---Advertisement---

 

Jalgaon Crime : या परिसरात प्रचाराला का आले असे विचारत उमेदवार महिलेच्या सासऱ्याला प्रतिस्पर्धी उमेदवार महिलेच्या दिराने मारहाण केली. ही घटना बुधवारी ७ जानेवारी सकाळी ११ वाजता चौघुले प्लॉट परिसरात घडली. या प्रकरणी मारहाण करणारा आबा रमेश बाविस्कर (रा. वाल्मीक नगर) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक २ ‘ब’मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) उमेदवार रेखा भगवान सोनवणे या व त्यांचे पती भगवान सोनवणे, सासरे काशिनाथ धोंडू सोनवणे तसेच इतर नातेवाईक बुधवारी प्रचारासाठी चौघुले प्लॉट भागात गेले. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवार उज्ज्वला बाविस्कर यांचे दीर आबा बाविस्कर हा तेथे आला. ‘तुम्ही येथे प्रचाराला का आला, तुम्ही येथे प्रचार करून नका’ असे म्हणत त्याने शिवीगाळ करून काशिनाथ सोनवणे यांना मारहाण केली. तसेच तू प्रचार केला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली, असे शनिपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये तक्रारदाराने म्हटले आहे. तसेच उमेदवार सोनवणे यांच्या नणंद संगीता वसंत कोळी
यांना देखील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी काशिनाथ सोनवणे यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आबा बाविस्कर याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मारहाणीच्या घटनेनंतर उमेदवाराचे पती भगवान सोनवणे, सासरे काशिनाथ सोनवणे व अन्य मंडळी थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात पोहचले. तेथे त्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन घटना सांगितली. त्यावेळी संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षकांनी सांगत पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे सांगितले.

पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांशी बोलताना भगवान सोनवणे यांनी सांगितले की, या भागात असलेल्या दहशतीमुळे गेल्या पाच दिवसांपासून आपण प्रचार करीत नव्हतो. मात्र बुधवारी प्रचारासाठी गेल्यानंतर वडिलांना मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच तुम्ही पुन्हा येथे आले तर तुम्हाला मारू, या पूर्वी दोन खून केले असून तुम्हालाही सोडणार नाही, अशी धमकी देत भविष्यात तुम्ही आमचे दुश्मन असणार, असेही धमकावण्यात आल्याचे सोनवणे यांनी सांगितले. मारहाणीत वडिलांचा गाल सुजला असून चष्माही तुटल्याचे सांगितले. आमच्या जिवाला धोका असल्याने प्रशासनाने मदत केली नाही तर आम्ही या पुढे प्रचाराला जाणार नाही, असेही ते म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---