जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील शिव कॉलनी स्टॉपजवळ रस्ता ओलंडण्याऱ्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याला भरधाव कंटेनरने चिरडल्याने त्याचा जागीच अंत झाला. हा अपघात आज रविवारी (1 जून ) रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेदारम्यान घडला. या अपघातात ठार झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव विशाल रमेश सोनार (वय 44 ) असे आहे. अपघातानंतर कंटेनर चालक वाहन घेऊन तात्काळ पसार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल सोनार हे पाळधीकडून जळगाव शहराकडे जाणाऱ्या महमार्गावरील शिवकॉलनीजवळ रस्ता ओलांडत होते. याचवेळी वेगाने आलेल्या एका अज्ञात कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली आणि त्यांना चिरडले. अपघातानंतर कंटेनर चालक न थांबता घटनास्थळावरून पसार झाला. मयत विशाल सोनार यांच्या खिशात त्यांचे ओळखपत्र आढळून आले. त्यावरून ते महसूल विभागात शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले. घटनास्थळी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे पथक दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.
विशाल सोनार यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी तात्काळ मृतदेहाचा पंचनामा केला आणि एका खाजगी वाहनातून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला.
दरम्यान, या अपघाताची माहिती कळताच मयत विशाल सोनार यांच्या नातेवाईकांनी देखील रुग्णालयात धाव घेतली आहे. या अपघातप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. फरार कंटेनर चालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. याकरिता सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मदत घेतली जात आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.