जळगाव : शहरात मागील काही दिवसांमध्ये रस्त्याने जाणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींचा विश्वास संपादन केला जातो. यावेळी त्यांच्याशी जवळीक साधत त्यांच्याजवळील सोने काढून ठेवण्यास सांगितले जाते. यानंतर ते सोन्याचे दागिने हातचलाखी करीत लंपास करण्याच्या घटना उघड होत आहे. असाच प्रकार पाचोरा तालुक्यातील जामणेगाव गावातील साठ वर्षीय कस्तुराबाई लक्ष्मण पाटील यांच्या सोबत घडला.

त्यांना आजारातून बरे होण्यासाठी सोनपोत मंत्रवून देण्याचा बहाणा करीत त्यांच्या गळ्यातील सोनपोत लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुलजार लाठिया बजरंगी (वय ७७, रा. जाखणीनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणात बजरंगी याच्या मुलाचाही समावेश असून त्याचा शोध घेतला जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, कस्तुराबाई पाटील ह्या नवीनस्थानक परिसरातील भजेगल्लीतून त्यांच्या मुलाच्या घरी १५ मे रोजी पायी जात होत्या. यावेळी त्यांना एका व्यक्तीने थांबवले. यावेळी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याजवळील सोन्याची पोत घेऊन दोघांनी पोबारा केला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन फसवणूक करणारे हे दोघे बाप-बेटे असून ते जखणी नगरात राहत असल्याचे त्यांना समजले. यानुसार त्यांनी त्यांनी उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, अक्रम शेख, हरिलाल पाटील, विजय पाटील, प्रवीण भालेराव, किशोर पाटील यांचे पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या.दरम्यान, या पथकाने गुलजार लाठिया बजरंगी याला ताब्यात घेतलं असून त्याचा मुलगा फरार आहे.