जळगाव : आजकाल ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांत वाढ होत आहे. तसेच विविध माध्यमातून व्यवहार करत असतांना प्रथम विश्वास संपादन करत फसवणुक झाल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. असाच प्रकार जळगाव शहरात उघड झाला आहे. यात सराफा व्यापाऱ्याची त्यांच्या विश्वासातील एका कारागिराने ९७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, जळगाव शहरातील श्रीकृष्णनगरातील अंकुश पुंडलिक सोनवणे (वय ३२) हे सोने खरेदी- विक्रीचा व्यवसाय करतात. योगेश भगवान गोयर(वय ३२) याच्याकडे अंकुश सोनवणे यांनी मोठ्या विश्वासाने ऑगस्ट महिन्यात ऑर्डरचे १३ ग्रॅम वजनाचे ७८ सोन्याचे मणी देत ते सराफा बाजारातील अहिरराव मनीवाले यांच्याकडे देण्यास सांगितले. या ७८ मनींची किंमत ९७ हजार ५०० रुपये आहे.
परंतु, योगेश गोयल याने ऑर्डरची डिलिव्हरी केली नाही. या सोन्याचे मनींचे त्याने अपहार करत परस्पर विक्री करून टाकली होती. त्यासंदर्भात अंकुश सोनवणे हे अनभिज्ञ होते. मात्र, दिलेली ऑर्डर संबंधित ठिकाणी न पोहचल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यासंदर्भात अंकुश सोनवणे यांनी बुधवार, २७ नोव्हेंबर रोजी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. या दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस स्टेशनला संशयित योगेश भगवान गोयल याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार रघुनाथ पवार तपास करीत आहे.