Jalgaon Crime : घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका महिलेसह तिचे पती आणि मुलगा यांना शिवीगाळ व मारहाण केली, तर त्यांच्या मालकीची कार आणि दुचाकीचे नुकसान केल्याची घटना अहुजा नगरात गुरुवारी (१५ मे) रात्री ९.३० वाजता घडली. यासंदर्भात रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, सुवर्णा गणेश गायकवाड (वय ३४) या महिला आपल्या पती आणि मुलगा यांच्यासह अहुजा नगरात वास्तव्याला आहेत. गुरुवारी (१५ मे) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास लहान मुलांना शिवीगाळ करीत असत्याच्या जाब विचारल्याच्या कारणावरून सुवर्णा गायकवाड यांना शेजारी राहणारे रवींद्र सुरेश सपकाळे आणि अश्विनी रवींद्र सपकाळे यांनी शिवीगाळ करीत सुवर्णा गायकवाड यांच्यासह त्यांचे पती आणि मुलगा यांना लोखंडी आसारीने बेदम मारहाण केली, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
गायकवाड यांच्या घरासमोर असलेली त्यांच्या मालकीची कार आणि बुलेट गाडीवर आसारी मारून नुकसान केले आहे. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर सुवर्णा गायकवाड यांनी जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री ११ वाजता रवींद्र सुरेश सपकाळे आणि अश्विनी रवींद्र सपकाळे दोन्ही रा. अहुजा नगर, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गुलाब माळी करीत आहेत.