जळगाव : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत नाविण्यपूर्ण योजनांसाठी जिल्हा स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. यानुसार जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विभागीय स्तरावर नाविण्यपूर्ण उपक्रमांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या अनुषंगाने 20 ते 27 मे 2025 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती कॉन्फरन्स हॉलमध्ये सादरीकरणाचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. या सादरीकरणात प्रत्येक विभागाने आपल्या विभागाशी निगडीत किमान एक नाविन्यपूर्ण प्रस्ताव पीपीटी स्वरूपात अंदाजपत्रकासह सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 3 मे 2025 रोजी झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने जिल्हा नियोजन समिती कार्यालयाने 16 मे 2025 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन पत्राद्वारे केले होते. या सादरीकरणात संबंधित अधिकारी यांनीच प्रत्यक्ष हजर राहून प्रस्ताव मांडावेत. प्रतिनिधीमार्फत सादरीकरण मान्य होणार नाही. प्रत्येक प्रस्ताव नाविन्यपूर्ण, उपयुक्त आणि जिल्ह्याच्या विकासासाठी परिणामकारक असावा, याकडे सर्व विभागांनी लक्ष द्यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.