---Advertisement---
जळगाव शहराच्या आरोग्याशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आव्हाणे शिवारातील घनकचरा डंपिंग ग्राऊंडवरील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी महापौर Dipmala Kale यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित कामांचा सखोल आढावा घेत तात्काळ काम सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
गेल्या काही काळापासून या ठिकाणी कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट न लागल्यामुळे आणि उघड्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. बैठकीत कचरा फॅक्टरी परिसरातील कंपाऊंड वॉल, रॅम्प आणि अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
मात्र, या कामांना काही तांत्रिक अडचणी असल्याचे मक्तेदारांनी स्पष्ट केले. सुमारे ८५ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रावर ६ मीटरपर्यंत कचरा साचलेला असून, जमीन उंच-सखल असल्याने तो कचरा हटवून जागा समतल केल्याशिवाय काम करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.
यावेळी शहर अभियंता योगेश बोरोले यांनी माहिती देताना सांगितले की, मूळ अंदाजपत्रकात कचरा हटवणे आणि वाहतूक यांचा समावेश नव्हता. त्यामुळे आता शिल्लक निधीतून वाढीव कामासाठी सुधारित प्रस्ताव तयार केला जाणार आहे.
महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी बायोमायनिंगच्या कामाला वेग देत पुढील २५ दिवसांत ते पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच महापालिकेच्या यंत्रणेद्वारे कचरा बाजूला करून कामासाठी जागा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
दरम्यान, महापौरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सुरक्षा आणि दुर्गंधी नियंत्रणासाठी सर्वप्रथम कंपाऊंड वॉलचे काम प्राधान्याने सुरू करणे आवश्यक आहे. “कामात कोणताही विलंब सहन केला जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच, स्थानिक पातळीवर विरोध झाल्यास पोलीस बंदोबस्तात काम पूर्ण करण्याच्या सूचना देत प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले.
या बैठकीला उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, आयुक्त आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन कचरा डेपोची समस्या लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









