जळगाव खुर्दला ३ कोटींचे वीज उपकेंद्र; शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज: पालकमंत्री गुलाबराव पाटील

---Advertisement---

 

जळगाव तालुक्यातील जळगाव खुर्द येथे AIIB योजनेअंतर्गत ३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या 33/11 केव्ही क्षमतेच्या नवीन वीज उपकेंद्राचे भूमीपूजन जलसंपदा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले.

या नवीन वीज उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा सलग ८ तास वीजपुरवठा, तर ग्रामस्थांना २४ तास अखंड वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेती, घरगुती व व्यावसायिक वापरासाठी हे उपकेंद्र मोठे वरदान ठरणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, मुख्यमंत्री कृषी सौर योजनेअंतर्गत वीज वितरण कंपनीने मिशन मोडवर काम करावे. तसेच कंत्राटदारांनी सर्व कामे ठरलेल्या कालावधीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, कामात कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिताताई वाघ उपस्थित होत्या. त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचे कौतुक करत सांगितले की, दिलेला शब्द पूर्ण करण्याची त्यांची कार्यपद्धती जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देत आहे. ग्रामीण व शेतकरी वीज पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

AIIB योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण ३५ नवीन वीज उपकेंद्रे, १२२६ नवीन ट्रान्सफॉर्मर, ३० व ११ केव्ही बंद केबल लाईन्स तसेच सिव्हिल कामांसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. यासोबतच जळगाव खुर्द येथे भिल्ल समाजासाठी समाजमंदिर तसेच खिरडी येथे हनुमान मंदिर परिसरातील बांधकामालाही मंजुरी देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक अभियंता पवन वाघुळदे यांनी केले, तर कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास वीज वितरण विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---