---Advertisement---
पूर्वेस चौधरीची वादळी खेळी; कर्णधार जगदीश झोपेची भेदक गोलंदाजी
जळगाव (प्रतिनिधी): जैन ड्रीम स्पेसेसच्या भव्य मैदानावर रंगलेल्या जळगाव क्रिकेट लिगच्या (JCL) दुसऱ्या पर्वाच्या थरारक अंतिम सामन्यात जळगाव कोगटा किंग्ज संघाने बाजी मारली आहे. फलंदाज पूर्वेस चौधरीच्या मॅचविनिंग खेळीच्या जोरावर कोगटा किंग्जने अमळनेर सुहांस जायंट्सवर ५ गडी राखून मात करत विजेतेपदाचा चषक उंचावला.
अंमळनेरची संघर्षमय फलंदाजी
नाणेफेक जिंकून जळगाव कोगटा किंग्जचा कर्णधार जगदीश झोपे याने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अमळनेर सुहांस जायंट्सकडून शुभम शर्माने ४३ चेंडूत ६२ धावांची (९ चौकार, २ षटकार) तर रणजित निकमने २९ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. मात्र, जळगावच्या जगदीश झोपेने १८ धावांत ४ बळी आणि उबेद खाटिकने १३ धावांत ३ बळी घेत अमळनेरला निर्धारित २० षटकांत ८ बाद १६६ धावांवर रोखले.
कोगटा किंग्जचा विजयाचा थरार
१६७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या कोगटा किंग्जला ओम भोसले (३४ धावा) आणि जितेंद्र निकम (३३ धावा) यांनी ५० धावांची वेगवान सलामी दिली. त्यानंतर मनिष चौहानने ३६ धावांचे योगदान दिले. अखेरच्या टप्प्यात पूर्वेस चौधरी याने अवघ्या २२ चेंडूत ५ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ४३ धावा कुटत १८.२ षटकातच संघाला विजय मिळवून दिला. अमळनेरकडून सतीश चतुर्वेदीने ३ बळी घेतले, तर शुभम शर्माने अवघ्या ५ धावा देत एक निर्धाव षटक टाकले, मात्र ते विजयासाठी अपुरे पडले.
* पारितोषिकांचा वर्षाव*
विजेत्या व खेळाडूंवर लाखोंच्या बक्षिसांची लूट करण्यात आली:
विजेता (जळगाव कोगटा किंग्ज): ₹२,००,००० रोख आणि चॅम्पियन्स ट्रॉफी.
उपविजेता (अमळनेर सुहांस जायंट्स): ₹१,००,००० रोख आणि ट्रॉफी.
प्लेअर ऑफ द लीग: शुभम शर्मा (पल्सर मोटारसायकल व किट).
सर्वोत्कृष्ट फलंदाज: ओम भोसले (ऑरेंज कॅप व ₹१५,०००).
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: रवी पाटील (पर्पल कॅप व ₹१५,०००).
सामनावीर (अंतिम सामना): पूर्वेस चौधरी.
ग्रॅण्ड फायनलच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सिद्धार्थ बाफना, यश मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमधील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले.
अखिलेश तिलकपूरे यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने आणि आकर्षक रोषणाईने प्रेक्षकांची मने जिंकली. मेहरुण परिसरातील जैन ड्रीम स्पेसेस मैदानावर जळगावकरांनी तुडुंब गर्दी केली होती, ज्यामुळे प्रेक्षकांच्या उपस्थितीचा नवा विक्रम प्रस्थापित झाला.









