---Advertisement---
जळगाव : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून मुलींचे जीवन वाचवण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने आज एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. शहरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालय येथे आज बुधवार, ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेचा भव्य शुभारंभ महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की, “मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही समाजाची जबाबदारी आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमधील गंभीर आजार असून, योग्य वयात लसीकरण केल्यास यापासून बचाव होऊ शकतो. जळगावमधील जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलींचे महापालिकेच्या रुग्णालयात लसीकरण करून घ्यावे.”
या मोहिमेअंतर्गत शासकीय आरोग्य संस्थांमध्ये १४ वर्षांच्या सर्व मुलींना ही ‘एचपीव्ही’ लस विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये या लसीची किंमत अधिक असते, मात्र शासनाने सामान्य जनतेसाठी ही सेवा मोफत सुरू केली आहे.
या कार्यक्रमाला महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा उगले, आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स आणि परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डॉ. मनीषा उगले यांनी यावेळी लसीकरणाचे महत्त्व स्पष्ट करताना पालकांना U-WIN डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्याचे आवाहन केले.
लस कोणासाठी : १४ वर्षांच्या सर्व मुलींसाठी. नोंदणी : uwin.mohfw.gov.in या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक किंवा एएनएम यांच्याशी संपर्क साधावा.









