Jalgaon News : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचालीनी वेग धरला आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी राजकीय पक्षांच्या प्रमुखांसोबत बैठक घेत चर्चा केली. या वेळी मतदार यादी अद्ययावतीकरण प्रक्रिया सुरू असून या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार नोंदणी व यादीतील सुधारणा यासंदर्भात विविध सूचना दिल्या.
‘व्होटर सर्च ॲप’चा प्रभावी वापर
मतदारांना आपली नावे मतदार यादीत आहेत की नाहीत, याची खात्री करण्यासाठी ‘व्होटर सर्च अॅप’ चा प्रभावी वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच बोगस, दुबार किंवा चुकीची नावे असल्यास तत्काळ ऑनलाइन तक्रार करावी असेही ते म्हणाले. मतदार यादीतील नावांची शुद्धता राखण्यासाठी समाजमाध्यमांद्वारे जनजागृती करावी आणि कोणताही मतदार दुबार नोंदवला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सांगताना जिल्हाधिकाऱ्यांनी मयत, स्थलांतरित तसेच शिक्षण, रोजगार वा विवाहामुळे कायमस्वरूपी इतरत्र गेलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या बैठकीस भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगराध्यक्ष एजाज मलिक, कॉंग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, वासुदेव पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.