जळगाव : महापालिका प्रशासनाने घेतलेल्या ‘रेडिरेकनर दर ७ टक्के ‘ निर्णयाच्या निषेधार्थ शुक्रवारी (३० मे) रोजी फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांनी महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी फुले मार्केट असोसिएशन, पहिला माळा असोसिएशन आणि सेंट्रल फुले मार्केट असोसिएशनचे सदस्य सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापालिकेत आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेत रेडीरेकनर दर, तसेच मार्केटमधील अतिक्रमणाच्या समस्येबाबत चर्चा केली. दरम्यान, यावर आयुक्तांनी साकात्मक प्रतिसाद दिल्याचे महात्मा ज्योतिबा फुले सेंट्रल म्युनीसिपल मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मताणी यांनी सांगितले.
महापालिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी फुले मार्केट परिसरात सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास व्यापारी एकत्र आले होते. सर्व व्यापाऱ्यांनी काळे कपडे परिधान करुन मोर्चात सहभागी होत निषेध व्यक्त केला. नूतन ड्रायफ्रुट्स जवळ व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चार-चार व्यापाऱ्यांची रांग करून एकत्रितपणे महानगरपालिकेवर मोर्चा काढला. यावेळी त्यांच्या हातात फुले मार्केटमधील अतिक्रमणाचे फोटो होते. यावेळी त्यांच्याकडून व्यापारी एकता जिंदाबाद, मार्केटमधील अतिक्रमण हटाव आदी घोषणा देण्यात आल्या. हा मोर्चा टॉवर चौकातून महापालिकेवर धडकला असता यावेळी मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आयुक्तांना देण्यात येणारे निवेदन सर्व व्यापाऱ्यांना वाचून दाखविण्यात आले.

शिष्टमंडळाने आयुक्तांची घेतली भेट
सेंट्रल फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मताणी यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी उपायुक्त भाग्यश्री शिंदे, शहर अभियंता उदय पाटील, मुख्यलेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे आदी अधिकारी देखील उपस्थित होते. व्यापाऱ्यांकडून भाड्यापोटी आकारण्यात येणाऱ्या दर रेडीरेकनर प्रमाणे ७ टक्के वाढणार असल्याने ही बाब व्यापाऱ्यावर अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केली. आमच्याकडून जुन्या दराने भाडे आकारणी करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. यावेळी आयुक्तांनी कायद्यात झालेले बदल शिष्टमंडळाला पटवून सांगतिले. यावर मनपाचे नुकसान होणार नाही तसेच व्यापाऱ्यांवर देखील आर्थिक भाराचा बोजा येणार नाही, असा सुर्वणमध्ये काढण्याची मागणी केली. यावर आयुक्तांनी भाडे हे महापालिका ठरवीत नसून ते भाडे निर्धारण समिती ठरवत असल्याची बाब शिष्टमंडळाला निदर्शनास आणून दिली. या समितीत शासनाच्या विविध विभागातील अधिकारी आहेत. या समितीच्या बैठकीत यावर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असेही आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी स्पष्ट केले.
आयुक्त व व्यापाऱ्यांमध्ये तू – तू – मै- मै

फुले मार्केट हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. काही विक्रेते गाळ्यांसमोर आपली दुकाने थाटात असल्याने आपला व्यवसाय होत नसल्याची व्यथा यावेळी मांडली. या अतिक्रमणधारकांमुळे गाडी पार्किंगची समस्या देखील उद्भवली आहे. अतिक्रमणधारक स्टॉलधारक यांनी लावलेल्या दुकानांमुळे व्यापारी तसेच मार्केटमध्ये येणारे ग्राहक यांना पार्किंगसाठी जागाच शिल्ल्क राहत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. महापालिकेने अतिक्रमण काढल्यावर पुन्हा दोन -तीन दिवसात जैसे थे होत असते. यावर कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी केली. यावेळी आयुक्त व व्यापाऱ्यांमध्ये तू – तू – मै- मै झाली. जर आम्ही अतिक्रमणधारकांना काही बोलण्यास गेलो तर ते आम्हाला धमकवितात असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळात महात्मा ज्योतिबा फुले सेंट्रल म्युनीसिपल मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मताणी, महात्मा ज्योतिबा फुले मार्केट व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष अशोक कौरानी, कोषाध्यक्ष राजेश वरयानी, सचिव सुशील हसवानी, बबलू समडिया, राम हळंदी दिलीप पंजाबी,दिपु मंधान, अशोक धारिडा, प्रदिप जैन, पवन मित्तल,मनिष कुकरेजा, आमिर पटेल,रमेश भागवाणी, काशीनाथ वाणी, तुषार वाणी, राजेश भागवाणी, सुनिल बुटवानी, विशाल कुकरेजा, हंसु जेठवानी, दिपक बाविस्कर, अमर कारडा, विष्णु जाधवाणी, तुषार देवरे, फुले मार्केट अध्यक्ष अशोक कौराणी, राजेश वरयानी, अनिल हासवानी, राजेश जवाहराणी ,गुरमुख दास तलरेजा, रामदास कुकरेजा, मन्नु आहुजा, शैलेश मनोहर नाथानी, मोहन विसरानी, फुले मार्केट पहिला माला टिकम दास तेजवानी, हिरा कटारिया
घनश्याम कारडा आदींचा सहभाग होता.