Jalgaon News : जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांची मृतसाठ्याकडे वाटचाल सुरू असून, सद्यः स्थितीत बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यातील मोठे हतूनर प्रकल्पात ४३.५३, गिरणा २८.६३ व वाघूर ७४.१२ टक्के असा उपयुक्त जलसाठा आहे. हतनूर व गिरणा प्रकल्पातून सिंचनासह पेयजलासाठी तीन आवर्तन देण्यात आली आहेत. गिरणा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी चौथे आवर्तन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसारच सोडण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
जिल्ह्यात में हिटचा तडाखा सुरू झाला आहे. दिवसा ४२ ते ४६ अंशादरम्यान कमाल तापमानाचा पारा राहत असून उष्णतेचा फटका जाणवत आहे. अशात जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांच्या जलसाठ्यात बाष्पीभवनामुळे घट होत असून सर्वच प्रकल्पांत सरासरी ३८.०९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी सद्यःस्थितीत गिरणा प्रकल्पात २८.६३ टक्के, हतनूर ४३.५३ टक्के, तर वाघूर ७४.१२ टक्के (६.५१ टीएमसी) असा सरासरी ४३.३४ टक्के अर्थात १५.७२ टीएमसी जलसाठा शिल्लक आहे.
१४ मध्यम आणि ९६ लघु प्रकल्पात सरासरी ३८.०९ टक्के जलसाठा आहे. मॉन्सूनकाळात १०० टक्के साठा असलेल्या मध्यम प्रकल्पापैकी बोरी, भोकरबारीत जवळजवळ मृतसाठा नसून अग्न्नावती व हिवरा प्रकल्पांची मृतसाठ्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. गिरणा प्रकल्पावर ग्रामीण योजनांसह चार ते पाच तालुक्यांच्या नगर परिषदांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. उन्हाळ्यातील टंचाईची तीव्रता पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आगामी चौये आवर्तन हे पेयजलासाठीच सोडण्यात येणार आहे.
जिल्ह्यात दोन प्रकल्पात ठणठणाटासह मृतसाठ्याकडे वाटचाल सुरू आहे. यात हतनूर ४३.५३, गिरणा २८.६३, वाघूर ७४.१२ असा एकूण सरासरी ४३.३४ टक्के अर्थात १५.७२ टीएमसी जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पांपैकी बोरी शून्य टक्के, भोकरबारी ०.९९ टक्के, अग्रावती १५.९२, हिवरा १५.३८ टक्के यानुसार मृत जलसाठ्याकडे वाटचाल असून यातून आता पाणी सोडणे अशक्य आहे. शेळगाव बरेज २२.९४, मन्याड १९.९४, तोंडापूर २४.९३, बहुळा ३०.५८. अंजनी ३१.२४, तर पूर्व भागातील सुकी ७६.६३, अभोरा ६९.५५, मंगरूळ ४५.८२, मोर ६७.८८ आणि गूळ ६५.३६ असा मध्यम प्रकल्पात सरासरी ३३.१९ टक्के अर्थात ३.६८ टीएमसी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.
गिरणा प्रकल्पावर पाचोरा, चाळीसगाव आणि भडगावसह सुमारे २०० च्यावर ग्रामीण तसेच नगरपालिका पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. या प्रकल्पातून आतापर्यंत सिंचनासह तीन बिगरसिंचनाची आवर्तने दिली आहेत. प्रकल्पात २८.६३ टक्के अर्थात ५.२९ टीएमसी पाणीसाठा आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि कालवा समितीच्या निर्णयानुसार सद्यःस्थितीत आगामी काळातील चौथे आवर्तन हे फक्त पेयजलासाठीच सोडण्यात येईल.
देवेंद्र अग्रवाल, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव
जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव नगर परिषदांसह सुमारे दीडशेच्यावर ग्रामीण पाणीपुरवठा योजना गिरणा प्रकल्पावर अवलंबून आहेत. या प्रकल्पातून आतापर्यंत सिंचनासह पेयजलासाठी तीन आवर्तनं दिली आहेत. गत एप्रिल आणि सध्या मे महिन्यात दिवसेंदिवस वाढते तापमान पाहता गिरणा प्रकत्यात सद्यस्थितीत २८.६३ टक्के उपयुक्त जलसाठातीन महिने पुरवावा लागणार आहे. पाणीवापर संस्थांनी व जिल्हावासीयांनी मिळणाऱ्या पेयजलाचा वापर काटकसरीने करावा.
– आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जळगाव