जळगाव : जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या जुन्या जळगावातील श्रीराम मंदिर संस्थानतर्फे सालाबादप्रमाणे कार्तिकी प्रबोधनी एकादशीनिमित्त यंदाही भव्य श्रीराम रथोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. कार्तिकी प्रबोधिनी एकादशी मंगळवारी, १२ नोव्हेंबर रोजी १५१ वा रथोत्सव पार पडणार आहे. रथोत्सवाची संपूर्ण तयारी झाली असून जळगाव नगरी हा रथोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे.
कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला पहाटे चार वाजता काकड आरती, प्रभू श्रीरामांच्या उत्सव मूर्तीस महाभिषेक,सकाळी सात वाजता महाआरती, सकाळी साडेसात ते साडेआठ सांप्रदायिक परंपरेचे भजन त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात सकाळी साडेदहा वाजता श्रीराम रथाचे महापूजन वंशपरंपरेने श्रीराम मंदिर संस्थांचे प्रमुख विश्वस्त, विद्यमान पंचम गादीपती हरिभक्ती परायण श्री मंगेश महाराज जोशी (श्री अप्पा महाराजांचे पाचवे वंशज) यांच्या हस्ते व शहरातील समस्त ब्रह्मवृंद मंडळी यांच्या वेद मंत्र घोषात होईल.
वंशपरंपरेने हरिभक्ती परायण श्री मंगेश महाराजांच्या हस्ते श्रीराम रथाचे पूजन व महाआरती होईल. संस्थानतर्फे उपस्थित प्रमुख पाहुणे व रथोत्सवाचे मानकरी सेवाधारी यांचा सत्कार करण्यात येईल. त्यानंतर श्रीराम रथावर आरुढ होणारी प्रभू श्रीरामचंद्रांची उत्सव मूर्तीची आरती होऊन रथावर मूर्ती विराजमान होईल. रथावर गरुड, मारुती, अर्जुन, दोन घोडे आदी मुर्त्या असतात. रथाचे अग्रभागी सनई, नगारा, चौघडा, झेंडेकरी, वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ, श्रीराम भजनी मंडळ तसेच जवळच्या खेड्यावरील भजनी मंडळी, श्री संत मुक्ताबाईंच्या पादुका असलेली पालखी व त्यामागे श्रीराम रथ असा भव्य दिव्य जलग्राम नगर दिंडी प्रदक्षिणा म्हणजेच रथयात्रेस दुपारी बारा वाजता श्रीरामांच्या जयघोषात ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान येथून प्रारंभ होईल.
याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, बालन्यायालय मंडळ प्रमुख न्यायाधीश मनीषा जसवंत, दिवाणी न्यायाधीश बढे साहेब, धर्मादाय उपायुक्त मोहन गाढे, ना. गिरीश महाजन, ना.गुलाबराव पाटील, खा.स्मिता वाघ, आ.सुरेश दामू भोळे, पोलीस अधीक्षक, स्पार्क इरिगेशनचे संचालक रविंद्र लढ्ढा, तहसीलदार, तलाठी, जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय पदाधिकारी व कर्मचारी, माजी महापौर, माजी उपमहापौर, सनातन संस्थेचे श्री नंदकुमार जाधव, राष्ट्रीय स्वयंसेवकचे स्वानंद झरे, विश्व हिंदू परिषदेचे योगेश्वर गर्गे, बजरंग दलाचे ललित चौधरी, हिंदू जनजागृतीचे प्रशांत जुवेकर तसेच जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर रामभक्तांच्या उपस्थितीत व श्रीराम मंदिर संस्थांचे समस्त विश्वस्त मंडळी तसेच रथोत्सवाचे मानकरी, सेवाधारी यांच्या उपस्थित प्रारंभ होईल.